पुणे : एबल २१०८ या दीर्घिका समूहात २० लाख प्रकाशवर्षे अंतरात पसरलेल्या दूर्मीळ रेडिओ स्रोताचा शोध घेण्यात भारतीय खगोलशास्त्रज्ञांना यश आले आहे. अद्ययावत केलेल्या जायंट मीरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या (यू-जीएमआरटी) सहाय्याने हे संशोधन करण्यात आले असून, येत्या काळात दीर्घिका समूहांची निर्मिती आणि उत्क्रांतीच्या घटनाक्रमाचा अभ्यास करण्यासाठी हा शोध उपयुक्त ठरणार आहे. राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राने (एनसीआरए) ही माहिती दिली. इंदूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या स्वर्णा चॅटर्जी यांच्या नेतृत्त्वाखालील या संशोधनामध्ये अभिरूप दत्ता (आयआयटी इंदूर), माजिदुल रहमान (नॅशनल त्सिंग हुआ युनिव्हर्सिटी तैवान), रुता काळे, (एनसीआरए पुणे) सुरजित पॉल (मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन) यांचा समावेश होता. या संशोधनाचा शोधनिबंध ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला.

दीर्घिका समूह ही विश्वात आकाराला आलेली सर्वात मोठी गुरुत्त्वाकर्षणाने बांधलेली रचना मानली जाते. दीर्घिका समूहाचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या हजार ट्रिलियन पट जास्त असते. या समूहांमधील विद्युत भारित कण दोन समूहांची टक्कर होऊन ऊर्जावान होतात. उर्जावान कण चुंबकीय क्षेत्रामध्ये रेडिओ वर्णपटात उत्सर्जन करतात. करतात. या उत्सर्जनांमधील रेडिओ अवशेष बहुतेक वेळा दीर्घिका समूहाच्या बाहेर आढळतात. असे रेडिओ अवशेष हे दीर्घिका समूहातील टक्करांमुळे झालेल्या शक्तिशाली धक्का तरंगांचे (शॉक वेव्ह) पुरावे आहेत. एबेल २१०८ हा कमी वस्तुमान असलेला दीर्घिका समूह आहे. या पूर्वी त्याच्या दक्षिणेकडील भागात रेडिओ प्रारण आढळले होते. संशोधकांनी केलेल्या नवीन निरीक्षणामध्ये दीर्घिका समूहाच्या उत्तरेला आणखी एक अस्पष्ट रेडिओ रचना आढळून आली. त्याला ‘एनई’ असे नाव देण्यात आले. या रेडिओ रचनेच्या शोधामुळे हा समूह दुर्मीळ दुहेरी रेडिओ अवशेष असलेला समूह म्हणून ओळखला जाईल. विशेष म्हणजे, नव्याने सापडलेली रचना दक्षिणेकडील (एस-डब्ल्यू) अवशेषाच्या दुप्पट मोठी, तसेच आतापर्यंत सापडलेल्या सर्वात कमी शक्ती असलेल्या रेडिओ अवशेषांपैकी एक आहे.

हेही वाचा : शरद पवार करणार पहिल्यांदाच सुप्रिया सुळे यांना मतदान…जाणून घ्या कारण

एक्सएमएम-न्यूटन क्ष-किरण दुर्बिणीतील क्ष-किरण निरीक्षणे वापरून संशोधकांना अवशेषांच्या स्थानावर एक कमकुवत धक्का (शॉक) आढळला. या दोन अवशेषांचे आकारविज्ञान भिन्न उत्पत्ती सूचित करते. एस-डब्ल्यू अवशेष ‘शॉक पॅसेज’द्वारे तयार होण्याची शक्यता आहे. तर ,एन-ई अवशेषाची विस्तारित रचना आणि अनेक रेडिओ आकाशगंगांची उपस्थिती रेडिओ दीर्घिकेतील जीवाश्म इलेक्ट्रॉन्सचे संकेत देते.

हेही वाचा : पुणे शहराचा खासदार झाल्यावर टिपू सुलतान यांचं भव्य स्मारक उभारणार : ‘एमआयएम’चे उमेदवार अनिस सुंडके

संशोधन का महत्त्वाचे?

विश्वातील सुरुवातीच्या आकाशगंगा समूहाची निर्मिती आणि चुंबकीय क्षेत्रे, वैश्विक किरण आणि आकाशगंगा समूहातील माध्यम यांच्यातील परस्परसंवाद समजून घेण्यासाठी एबेल २१०८ सारख्या कमी वस्तुमानाच्या दीर्घिका समूहांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. या शोधामुळे दीर्घिका समूहांची निर्मिती, उत्क्रांतीबाबत महत्त्वाची माहिती मिळू शकेल. हे संशोधन अद्ययावत जीएमआरटी लो मास क्लस्टर सर्वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यापक आणि अधिक महत्त्वाकांक्षी सर्वेक्षण उपक्रमाचा एक भाग आहे. हे सर्वेक्षण कमी-वस्तुमानाच्या दीर्घिका समूहांतील रेडिओ उत्सर्जनाचा शोधण्याचे आव्हानात्मक कार्य करते.