पुणे : मध्य रेल्वेच्या गाड्यांतील व्हिस्टाडोम डब्यांना प्रवाशांची पसंती मिळत आहे. मुंबई-गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची चित्तथरारक दृश्ये असोत की मुंबई-पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची नयनरम्य दृश्ये असोत, काचेचे छत आणि रुंद खिडक्या असलेले हे डबे लोकप्रिय ठरले आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये या डब्यांतून सुमारे पावणेदोन लाख प्रवाशांनी प्रवास केला असून, त्यातून रेल्वेला २६ कोटी ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

मध्य रेल्वेवरील व्हिस्टाडोम डब्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने ते लोकप्रिय ठरत आहेत. गेल्या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेच्या गाड्यांतील व्हिस्टाडोम डब्यांतून १ लाख ७६ हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यात प्रगती एक्स्प्रेस ३० हजार ९८१ प्रवासी, डेक्कन एक्स्प्रेस ३१ हजार १६२ प्रवासी, जनशताब्दी एक्स्प्रेस ३० हजार ७५८ प्रवासी, डेक्कन क्वीन २९ हजार ७०२ प्रवासी, शताब्दी एक्स्प्रेसमध्ये २४ हजार २७४ प्रवासी आणि तेजस एक्स्प्रेस २९ हजार ५२७ प्रवाशांचा समावेश आहे.

हेही वाचा : शरद पवार करणार पहिल्यांदाच सुप्रिया सुळे यांना मतदान…जाणून घ्या कारण

मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये २०१८ मध्ये व्हिस्टाडोम कोच पहिल्यांदा मध्य रेल्वेवर सादर करण्यात आले. प्रवाशांच्या प्रतिसादामुळे, मुंबई-मडगाव मार्गावरील दुसरा व्हिस्टाडोम कोच १५ सप्टेंबर २०२२ पासून तेजस एक्स्प्रेसला जोडण्यात आला. या डब्यांच्या लोकप्रियतेमुळे मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये २६ जून २०२१ पासून हे डबे सुरू करण्यात आले. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन १५ ऑगस्ट २०२१ पासून मुंबई-पुणे मार्गावरील आणखी दोन व्हिस्टाडोम डबे डेक्कन क्वीनला जोडण्यात आले. प्रगती एक्स्प्रेसमध्ये २५ जुलै २०२२ पासून तसेच पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये १० ऑगस्ट २०२२ पासून एक व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला.

हेही वाचा : भारतीय खगोलशास्त्रज्ञांची महत्त्वाची कामगिरी… शोधला २० लाख प्रकाश वर्षे अंतरात पसरलेला दुर्मीळ रेडिओ स्रोत

व्हिस्टाडोम डब्याची वैशिष्ट्ये

व्हिस्टाडोम डब्यांमध्ये काचेच्या छतासोबतच रुंद खिडक्या, एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट्स आणि पुशबॅक खुर्च्या, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर, दिव्यांगांसाठी रुंद सरकते दरवाजे, सिरॅमिक टाइल फ्लोअरिंग असलेली टॉयलेट यासह अनेक वैशिष्ट्ये असून व्ह्यूईंग गॅलरी आहे.