पिंपरी-चिंचवड: भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकारी असलेल्या युवतीने भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या विरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणानंतर राजकारण चांगलेच तापले होते. अखेर भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा दिला आहे.

भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकारी असलेल्या ३६ वर्षीय युवतीने अनुप मोरे यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल केला होता, यामध्ये विनयभंगाचादेखील समावेश होता. २६ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास पीडित युवतीला अनुप मोरे यांच्या पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांनी धमकावले होते. जीवे मारण्याची धमकी दिली होती. अश्लील शिवीगाळ करत पीडित युवतीला मारहाणदेखील करण्यात आली होती. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात अनुप मोरे यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी स्थानिक राजकारण चांगले तापले होते. या घटनेनंतर विरोधकांना आयते कोलीत मिळाले होते. आज पीडित युवतीने फेसबुक लाइव्ह करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्याय मागितला होता, भेटण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानंतर अगदी काही तासांत भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देऊन या घटनेवर पडदा टाकण्याचे काम होत असल्याचे बोलले जात आहे.

राजीनामा पत्रात अनुप मोरे यांनी नेमकं काय म्हटले आहे?

माझ्यावर काही दिवसांपासून खोटे आरोप केले जात आहेत. नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे. माझे कुटुंब गेल्या ४० वर्षांपासून पक्षाची अविरतपणे सेवा करत आहे. भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मला दिली आणि विश्वास ठेवला. माझा परिवार सदैव भाजपासोबत असेल आणि राहील. भाजपाची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे, तो राजीनामा स्वीकारावा.