पुणे : स्वयंपाकाच्या गॅस सिलींडरमधील गॅस रिकाम्या सिलिंडरमध्ये भरून काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली. त्यांच्याकडून ११४ गॅस सिलिंडर, पाइप, रेग्युलेटर, टेम्पो असा १७ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रफिक सुलतान शेख (वय ३८), सद्दाम अजिज शेख (वय २९), जमिर सुलतान शेख (वय ३६, तिघे रा. तुकाईनगर, वडगाव बुद्रुक), देवीसिंग रामसिंग राजपुत (वय ३६, रा. बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस शिपाई संदीप कोळगे यांनी फिर्याद दिली आहे. वडगाव बुद्रूक भागातील तुकाईनगर येथील मंगल रिढे यांच्या खोलीमध्ये भरलेल्या गॅस सिलिंडरच्या टाक्यांमधून गॅस पाइपद्वारे काढून रिकाम्या टाकीत भरण्यात येत होता. याबाबतची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला.

हेही वाचा – पिंपरी महापालिकेत सात गावांच्या समावेशाचा प्रस्ताव आठ वर्षांपासून धूळखात

हेही वाचा – पुणे : मेट्रोच्या कामासाठी येरवड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलावरील वाहतुकीत बदल; २१ एप्रिलपर्यंत रात्री वाहतूक बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी ११४ गॅस सिलिंडर, सात पाइप, रेग्युलेटर, टेम्पाे असा १७ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, आश्विनी पाटील, राजेंद्र कुमावत, अजय राणे, मनीषा पुकाळे आदींनी ही कारवाई केली.