जगभरात माहिती तंत्रज्ञानाचे जाळे विणले गेले, परिणामी यामुळे या क्षेत्रात युवकांना मोठय़ा प्रमाणात नोकरी-व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या. आता या संधी अंध मुला-मुलींनाही उपलब्ध होऊ शकतात. त्या दृष्टीने पुण्याच्या ‘निवांत अंध मुक्त विकासालय’ आणि ‘सीड इन्फोटेक’ यांच्याद्वारे अंध मुलांसाठी भारताच्या ब्रेल लिपीतील पहिल्या ‘सी प्रोग्रामिंग बुक’ची निर्मिती करण्यात आली आहे.
‘निवांत अंध मुक्त विकासालय’ आणि ‘सीड इन्फोटेक’च्या वतीने ‘सी प्रोग्रामिंग बुक’ तयार करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन नुकतेच हर्षद मुथा व आकाश साळवे यांच्या अंध मुलांच्या हस्ते करण्यात आले. विकासालयाच्या संचालिका मीरा बडवे आणि सीड इन्फोटेक लिमिटेडच्या कार्यकारी संचालक भारती बऱ्हाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यात अनेक अंध मुलेमुली यांच्या शिक्षणासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. विविध सेवाभावी संस्था, शाळा, महाविद्यालय या विशेष मुलांना सांभाळण्याचे व शिक्षण देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे या मुलांवरचे व पालकांवरील दडपण कमी झाले असून त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. या पुस्तकामुळे आता मुलांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
अंध मुलांसाठी गेली १८ वर्ष कार्य करणाऱ्या श्रीमती बडवे यांनी या पुस्तकनिर्मितीची कल्पना साकरली आहे. अंध मुलांना योग्य मार्गदर्शन आणि शिक्षण दिले, तर ते कोणत्याही क्षेत्रात विशेष कामगिरी करू शकतात, असे बऱ्हाडे यांनी या वेळी सांगितले. बऱ्हाडे म्हणाल्या, मी जगभर अंध मुलांच्या कार्यासाठी फिरले आहे. भारतात आणि त्यातही महाराष्ट्रात जेवढे या मुलांना आपलेसे करून शिकवले व सांभाळले जाते, ते इतर कुठेही होत नाही. ही मुलं अतिशय बुद्धिजीवी असून विकासालयात आतापर्यंत १ हजार ५०० विद्यार्थ्यांनी शिक्षण दिले आहे. ब्रेल लिपीत एससीआयटी हेच पुस्तक होते, मात्र त्यामुळे बेसिकच शिक्षण या मुलांना मिळत होते. त्यामुळे हा प्रयोग केला असून तो पूर्णपणे यशस्वी झाला आहे.
हे पुस्तक तयार करण्यास सहा ते सात महिने लागले आहेत. सी प्लस प्लस, व्ही.बी. यांसारखी आणखी पुस्तके ब्रेल लिपीत तयार करण्यात येणार आहेत. या पुस्तकांचे पूर्ण बाइडिंग, डिझाइन, चित्र सर्व या मुलांनीच केले आहे. हे पुस्तक देशातील अंध मुलांना विनामूल्य देण्यात येणार आहे. पुस्तक मिळवण्यासाठी ९४२२०३३१२२, ९९२३७७२३७५ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘‘नवीन काही तरी करायचे म्हणून निवांत अंध मुक्त विकासालयात प्रवेश घेतला होता. तेथील वातारण अत्यंत चांगले असून आम्हाला कधीही दु:ख वा चिडचिडपणा केले जात नाही. अत्यंत तळमळीने शिकवले जाते. दररोज इतराप्रमाणे आमचीही चौकशी करून पूर्ण माहिती घेतली जाते. आम्ही काहीही करू शकतो, हे या पुस्तकामुळे आता सिद्ध करता येणार आहे. ऑडियो ऐकून जास्त काहीच समजत नव्हते. त्यात मनही लागत नसायचे. पण या पुस्तकामुळे आता माझे स्वप्न या पुस्तकामुळे सत्य होणार आहे.’’
– हर्षद मुथा (अंध विद्यार्थी)
बी.एम.सी.सी. महाविद्यालय, बीसीए प्रथम वर्ष