रक्ताच्या दरांमध्ये जवळपास अडीच पटींनी झालेली वाढ आणि डेंग्यूच्या उद्रेकसदृश परिस्थितीमुळे ‘प्लेटलेटस्’ या रक्तघटकासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना करावी लागणारी पळापळ यात दिलासादायक ठरू शकणारी १०४ क्रमांकाची ‘ब्लड ऑन कॉल’ योजना पुणेकरांसाठी मात्र अजूनही फारशी फलदायी नसल्याचेच दिसून येत आहे.
पुण्यात या योजनेअंतर्गत अजूनही केवळ पूर्ण रक्त म्हणजे ‘व्होल ब्लड’च मिळते. या योजनेत प्लेटलेटस् उपलब्ध न होण्याचे कारणही मजेशीर आहे. जिल्हा रुग्णालयातील ‘मेट्रो रक्तपेढी’चे छप्पर गळत असल्यामुळे ही रक्तपेढी सुरू होत नसून त्यामुळे प्लेटलेटस्ही उपलब्ध होत नसल्याचे समोर आले आहे.
गेली सुमारे २ वर्षे जिल्हा रुग्णालयातील मेट्रो रक्तपेढी या ना त्या कारणाने रखडली आहे. या रक्तपेढीसंदर्भात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) रुग्णालयाला काही त्रुटींची पूर्तता करण्यास सांगितले होते. जून २०१४ पासून या त्रुटी पूर्ण करण्याचे काम सुरू असून सध्या रक्तपेढीचे छत गळत असल्याने त्यात नवीन अडचण निर्माण झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एस. साठे म्हणाले, ‘‘मेट्रो रक्तपेढीच्या वरच्या मजल्यावर ‘ट्रॉमा केअर युनिट’चे काम सुरू आहे. या बांधकामामुळे रक्तपेढीच्या खोलीचे छत खराब झाले असून त्यातून पाणी गळते आहे. खोलीच्या वरच्या बाजूस फरश्या बसवल्यानंतरच हे पाणी गळायचे थांबेल. छताची डागडुजी झाल्यावरही एफडीएची मंजुरी घ्यावी लागेल. हे काम करून घेण्यासाठी तीन आठवडय़ांची मुदत देण्यात आली आहे. मेट्रो रक्तपेढी सुरू नसल्यामुळे सध्या केवळ ‘होल ब्लड’ पुरवता येत आहे.’’
डेंग्यू तसेच कर्करोगावरील उपचारांमध्ये प्लेटलेटस् तर अॅनिमियासारख्या आजारांसाठी लाल रक्तपेशींची गरज असते. भाजलेल्या रुग्णांना प्लाझ्मा या रक्तघटकाची गरज भासते. मेट्रो रक्तपेढी सुरू होत नसल्याचा फटका पुण्यातील ‘ब्लड ऑन कॉल’ योजनेस बसत असल्याचा मुद्दा ‘लोकसत्ता’ने यापूर्वीही समोर आणला होता. ‘व्होल ब्लड’च्या तुलनेत इतर रक्तघटकांनाच असलेली मागणी अधिक असून सध्या शहरात उद्भवलेल्या डेंग्यूच्या उद्रेकसदृश परिस्थितीत मेट्रो रक्तपेढीचा फायदा होऊ शकला असता.
मेट्रो रक्तपेढी आणि ‘ब्लड ऑन कॉल’चा संबंध असा-
जिल्हा रुग्णालयातील रखडलेल्या मेट्रो रक्तपेढीत दर वर्षी रक्त आणि रक्तघटकांच्या एक लाख पिशव्यांचा पुरवठा करण्याची क्षमता असणे अपेक्षित आहे. ही रक्तपेढी सुरू झाल्यास १०४ या टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी केल्यानंतर पुढील एका तासात चाळीस किलोमीटरच्या परिघात शासकीय दरात रक्तघटकही उपलब्ध होऊ शकतील.