बनावट नोटा घेऊन येणाऱ्या तिघांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून शंभर रुपयांच्या ४९१ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
सचिन भिका कदम (वय ४३, रा. बिदलनगर सोसायटी, येरवडा), महेश लक्ष्मण धोत्रे (वय ३१, रा. खानापूर, ता. हवेली), भाऊसाहेब ऊर्फ सुनील दत्तोबा कांबळे (वय ३८, रा. गोऱ्हेखुर्द, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही जण एका मोटारीतून बनावट नोटा घेऊन डोणजे फाटा येथील एका इमारतीजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या भागामध्ये सापळा लावण्यात आला. माहिती मिळाल्यानुसार संबंधित मोटार त्या ठिकाणी आली असता, पोलिसांनी ती अडविली व त्यातील तिघांना ताब्यात घेऊन तपासणी केली. तपासणीमध्ये त्यांच्याकडे बनावट नोटा आढळून आल्या.
आरोपींकडून सुमारे दीड लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव, कर्मचारी ए. के. बादल, व्ही. आर. पाटील, डी. जी. जगताप, डी. एम. बनसुडे, ए. के. सकपाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Oct 2015 रोजी प्रकाशित
बनावट नोटा आणणाऱ्या टोळीला अटक
बनावट नोटा घेऊन येणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचून अटक केली. शंभर रुपयांच्या ४९१ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
Written by दया ठोंबरे
First published on: 02-10-2015 at 03:40 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bogus note gang arrest