पुणे : खेळामुळे होणाऱ्या दुखापती आणि अस्थिबंध, तंतुमय ऊती, स्नायूंना होणारी इजा यांसह हाडांमधील प्राथमिक टप्प्यातील झीज यांसारख्या अस्थिविकारांवर आता शस्त्रक्रियेविना उपचार शक्य होणार आहेत. हे उपचार पुनरुत्पादक औषधोपचार (रिजनरेटिव्ह मेडिसीन) पद्धतीद्वारे केले जाणार आहेत. यासाठी पुणेस्थित केके केअर हॉस्पिटलने आर्थोरिन्यूसोबत सहयोग केला आहे.
आर्थोरिन्यू हे अमेरिकास्थित रिजेनेक्स यूएसए कंपनीचे भारतातील अधिकृत प्रतिनिधी आहेत. रिजेनेक्स यूएसएची स्थापना २० वर्षांपूर्वी झाली असून त्यांनी जगभरात ५ लाख २० हजारांहून अधिक रुग्णांवर यशस्वीपणे उपचार केले आहेत. मुंबईस्थित आर्थोरिन्यूने पुण्यातील केके केअर हॉस्पिटलसोबत केलेल्या सहयोगामुळे रुग्णांना स्वत:च्या शरीरातील पेशी वापरून शक्य असेल तिथे शस्त्रक्रिया टाळत विविध सामान्य अस्थिविकार समस्यांवर उपचार घेता येणार आहेत, अशी माहिती केअर हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. वर्षा कुऱ्हाडे यांनी दिली.
भारतात वेदना व्यवस्थापनाबाबत फारशी जागरूकता नाही. वृध्द व्यक्तींची वाढती लोकसंख्या, खेळाडूंची वाढती संख्या आणि त्यांना होणाऱ्या दुखापती, असामान्य वेदनांना कारणीभूत असलेल्या दीर्घकालीन आजारांमध्ये वाढ या सर्व बाबी लक्षात घेता वेदना व्यवस्थापन क्षेत्र आगामी काळात वाढत जाणार आहे. आज प्रत्येक घरामध्ये एका व्यक्तीला तरी कुठल्या ना कुठल्या वेदना होत असतात. अशा विकारांवर पुनरुत्पादक औषधोपचाराने शस्त्रक्रियेविना उपचार करता येतील, असेही डॉ. कुऱ्हाडे यांनी स्पष्ट केले.
पुनरुत्पादक औषधोपचार म्हणजे काय?
पुनरुत्पादक औषधोपचारांमध्ये रुग्णांना स्वत:च्या शरीरातील पेशी वापरून शस्त्रक्रिया टाळत विविध अस्थिविकारांवर उपचार घेता येतात. या पद्धतीमध्ये रुग्णाच्या शरीरातून रक्ताचा छोटा नमुना घेतला जातो. त्यानंतर प्रयोगशाळेत या रक्तावर प्रक्रिया करून प्लेटलेट वेगळ्या केला जातात. या वेगळ्या केलेल्या प्लेटलेटचे रूपांतर नंतर प्लेटलेट-रिच प्लाझ्मामध्ये (पीआरपी) केले जाते. शरीरात इजा झालेल्या भागात लसीद्वारे या पीआरपी सोडल्या जातात. या पीआरपी दुखापत झालेल्या ठिकाणी पेशी आणि ऊतींची निर्मिती करतात. त्यामुळे तेथील झीज अथवा इजा भरून निघते. यामुळे रुग्ण बरा होऊन त्याच्या वेदनाही कमी होतात. यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता राहत नाही.