पुणे : म्युच्युअल फंडात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्याने एकास नऊ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार बाणेर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर काही दिवसांपूर्वी संपर्क साधला होता. चोरट्यांनी त्यांना म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना पर्मनंट कॅपिटल ॲप्लिकेशन हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने वेळोवेळी नऊ लाख रुपये घेतले.

दरम्यान, तक्रारदाराला कोणत्याही प्रकारचा परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड तपास करत आहेत.