पुणे : युद्धजन्य परिस्थितीमुळे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटन्ट) अभ्यासक्रमाची परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात ९ ते १४ मे या कालावधीत होणाऱ्या अंतिम, इंटरमिजिएट, पोस्ट क्वालिफिकेशन कोर्स या परीक्षांचा समावेश आहे. ‘आयसीएआय’ने प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती दिली.
संस्थेने आधी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २ ते १४ मे या कालावधीत परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात इंटरमिजिएट परीक्षेत गट एकची परीक्षा ३, ५ आणि ७ मे रोजी, तर गट दोनमधील परीक्षा ९, ११ आणि १४ मे रोजी होणार होती. तसेच, अंतिम (फायनल) परीक्षेतील गट एकमधील परीक्षा २, ४ आणि ६ मे रोजी, तर गट दोनमधील परीक्षा ८, १० आणि २३ मे रोजी घेण्याचे नियोजन होते. मात्र, देशाच्या सीमेवर उद्भवलेली तणावपूर्ण परिस्थिती, सुरक्षिततेबाबतची काळजी यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
आता परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर परीक्षा घेतल्या जातील. त्यासाठी नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी www.icai.org हे संकेतस्थळ पाहण्याचे आवाहन ‘आयसीएआय’चे संयुक्त परीक्षा सचिव आनंद कुमार चतुर्वेदी यांनी केले.