पुण्यातील ‘फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ (एफटीआयआय) या संस्थेच्या अध्यक्षपदी अभिनेता गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून सुरू झालेला वाद अद्याप संपलेला नसतानाच आता संपकरी विद्यार्थ्यांवर संस्थेच्या प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या नियुक्तीविरोधात गेल्या ३४ दिवसांपासून संपावर असलेल्या विद्यार्थ्यांना नोटीस बजावण्यात आली असून, संप तातडीने मागे घेण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर संप सुरूच ठेवला तर विद्यार्थ्यांवर संस्थेतून बडतर्फ करण्यापर्यंतची कडक कारवाई केली जाईल आणि त्याला विद्यार्थीच जबाबदार असतील, असे या नोटिसीत म्हटले आहे. विद्यार्थ्यांनी संप मागे घेऊन तातडीने नैमित्तिक अभ्यासक्रमामध्ये सहभागी व्हावे, अशीही सूचना करण्यात आली आहे. संस्थेचे संचालक डी. जे. नरेन यांनी स्वतःच्या अधिकारात ही नोटीस काढली आहे.
गेल्या महिनाभरापासून एफटीआयआयचे विद्यार्थी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्ती विरोधात आंदोलन करत आहेत. कलेच्या क्षेत्रात वैभवशाली परंपरा लाभलेल्या या संस्थेच्या अध्यक्षपदी पात्र व्यक्तीचीच निवड व्हावी, अशी इच्छा विद्यार्थ्यांची आहे. एफटीआयआयच्या अध्यक्षपदासाठी सहा महिन्यांपूर्वी संभाव्य उमेदवारांची जी यादी तयार करण्यात आली होती. त्यामध्ये अमिताभ बच्चन, रजनीकांत आणि श्याम बेनेगल अशा दिग्गजांची नावे संस्थेच्या अध्यक्षपदासाठी सुचविण्यात आली होती. मात्र, सरकारने या सगळ्यांना डावलून गजेंद्र चौहान यांच्याकडे एफटीआयआयचा कारभार सोपविण्याचा निर्णय घेतल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्याचा सरकारचा निर्णय पूर्णपणे योग्य नव्हता. मात्र, आता सरकार एकदा घेतलेल्या निर्णयापासून माघार घेऊ शकत नसल्याची कबुली खुद्द माहिती व प्रसारणमंत्री अरुण जेटलींनी आपल्यासमोर दिली होती, असा गौप्यस्फोट ऑस्कर विजेता रसुल पोकुट्टी याने केला होता.