लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्य मंडळाने घेतलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाला प्रवेशाची संधी मिळणार आहे. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्‍त आणि दूरस्थ अध्ययन प्रशाळेतंर्गत सुरू असलेल्या कला, वाणिज्य पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्ष प्रवेशांसाठी मुदतवाढ देण्यात आली असून, विद्यार्थ्यांना २५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

विद्यार्थी, नोकदारवर्ग आणि महिलांना शिक्षणाची संधी मिळण्यासाठी दूरस्थ अभ्यासक्रमाचा पर्याय उपलब्ध आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दूरस्थ अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एक महिन्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शहरातील बहुतांश महाविद्यालयातील पदवी, तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया संपली आहे किंवा अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पुरवणी परीक्षेतील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत यासाठी आता पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.

आणखी वाचा-पुणे: पाच वर्षांपासून थकवलेली तीन लाखांची पोटगी पतीने एका दिवसात भरली

आता दूरस्थ अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणीसाठी २५ सप्टेंबर, तर ऑनलाइन प्रवेश अर्जाचे शुल्क भरण्यासाठी २७ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रवेश अर्जाची प्रत आवश्‍यक त्या कागदपत्रांसह ४ ऑक्‍टोबरपर्यंत संबंधित अभ्यास केंद्रावर जमा करणे आवश्‍यक आहे, अशी माहिती मुक्‍त व दूरस्थ अध्ययन प्रशालेचे संचालक डॉ. वैभव जाधव यांनी दिली.