पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश केला आणि प्रशस्त दिसणाऱ्या रस्त्यांवर मध्येच वाहतुकीला अडथळा झाल्याचे जाणवल्यास तेथे हमखास मोटारी सुशोभित करण्याचे दालन (कार डेकोरेटर) आहे, असे समजावे. कारण, रस्त्यांवर उभ्या-आडव्या मोटारी उभ्या करणे, भर रस्त्यातच तासन्तास त्या मोटारींवर सजावटीचे काम करत राहणे, कितीही वाहतूककोंडी झाली तरी ‘आपला काय संबंध’ अशा पद्धतीने त्याकडे ढुंकूनही न पाहणे, हा या कार डेकोरेटर मंडळींचा रोजचा शिरस्ता झाला आहे. आपण रस्त्याचे जणू मालकच आहोत, या थाटात ही मंडळी राजरोस वागत असताना महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोलीस ‘खाते’ मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष करताना दिसतात.
दापोडी ते निगडी दरम्यानच्या १२ किलोमीटर अंतरावर पदपथ नावाचा प्रकार अस्तित्वात राहिला नाही. कारण, जागोजागी विविध प्रकारच्या व्यावसायिकांनी अतिक्रमणे  केली आहेत. त्यामुळे महामार्गावरून जीव मुठीत धरून चालण्याची वेळ आबालवृद्ध, महिला तसेच शाळकरी मुलांवर ओढवली आहे. उघडय़ा डोळय़ांनी दिसत असूनही  महापालिका व वाहतूक पोलिसांचे हात कारवाईसाठी सरसावत नाहीत, हे मात्र अनाकलनीय आहे. महामार्गावरील रस्ते मोठे करण्यासाठी पालिकेने वेळोवेळी रुंदीकरण केले. मात्र, त्याचा लाभ नागरिकांना झालाच नाही. वाढीव रस्त्यांवर सर्वात आधी व्यावसायिकांनी कब्जा घेतला, त्यात आघाडी घेतली कार सजावट करणाऱ्या व्यावसायिकांनी. अलीकडच्या काळात त्यांचे वागणे म्हणजे कहर झाला आहे. त्यांच्या दुकानासमोर वाहनांच्या रांगा लागतात, त्या रस्त्याच्या थेट मध्यापर्यंत असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. सायंकाळी तर भीषण परिस्थिती असते, हे रोजचे चित्र आहे. सामान्य नागरिकांना सावज पकडल्याच्या थाटात वागणाऱ्या ‘शूर’ वाहतूक पोलिसांना धनदांडग्यांचे हे अतिक्रमण मात्र दिसत नाही. तिथे त्यांचे काही चालत नाही. कारण, त्यामागे ‘हप्त्यां’चे अर्थकारण आहे. नाशिकफाटा ते शंकरवाडी दरम्यान वाहतूक पोलिसांच्या डोळय़ांसमोरच हा सगळा उद्योग चालतो. कासारवाडी, खराळवाडीत तोच प्रकार आढळून येतो. जिथे जिथे दालने आहेत, तिथे रस्त्यावरचे अतिक्रमण दिसते.
एवढय़ावरच हे अतिक्रमण थांबत नाही. अन्य व्यावसायिकांनी पदपथांवरील अतिक्रमण तितकेच गंभीर आहे. निगडी चौक, चिंचवडच्या मॉलसमोर, चिंचवड स्टेशन, पिंपरी पोलीस ठाण्यासमोर, जय मल्हार हॉटेल व पान स्टॉल, राका गॅस परिसर, पिंपरी पालिका मुख्यालयासमोर पदपथांवर रस्त्यावरच मंडई भरल्याप्रमाणे गर्दी असते, अंतर्गत भागातही वेगळे चित्र नाही. पादचाऱ्यांना चालण्याची सोय नाही. कोटय़वधी रुपये खर्च करून पालिकेने रस्ते केले, पदपथासाठी टप्प्याटप्प्यात तितकाच खर्च केला, मात्र सध्या पदपथ कुठे आहेत, ते शोधावे लागतील. कारण, जागोजागी अतिक्रमणे झाल्याचे दिसून येईल. नको तिथे नियमावर बोट ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना ते दिसत नाही.