रस्त्यामध्ये चालकाला मारहाण करून मोटारीसह त्यांच्या जवळील ऐवज चोरून नेण्याच्या दोन घटना शहरात घडल्या आहेत. भारती विद्यापीठ व हडपसर पोलीस ठाण्यांमध्ये याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेबाबत गणेश मारुती रगडे (वय २६, रा. गजाननमहाराज चौक, सहकारनगर) या चालकाने फिर्याद दिली आहे. रगडे हे स्विफ्ट मोटीरवर चालक आहेत. बुधवारी दुपारी मुंबईहून मोटार घेऊन येत असताना झोप आली म्हणून कात्रज बाह्य़वळण मार्गावर चौगुले शो-रुमजवळ त्यांनी मोटार रस्त्याच्या बाजूला लावली व मागील आसनावर झोपी गेले. त्या वेळी तीन अनोखळी व्यक्ती मोटारीजवळ आल्या. त्यांनी रगडे यांना उठविले व गळ्याला चाकू लावला. त्यांच्याजवळील सहा हजार रुपये, मोबाईलसह या चोरटय़ांनी मोटार (क्र. एमएच १२, जीझेड, ७०३७) पळवून नेली.
हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेबाबत सोपान देवराम काळे (वय ३७, रा. मु. पो. वाटलुज, ता. दौंड, जि. पुणे.) यांनी फिर्याद दिली आहे. काळे हे स्कॉर्पिओ मोटारीवर (क्र. एमएच ४२, ए, ८४९२) चालक आहेत. भिगवण गाडीतळ येथे ते भाडे घेण्यासाठी उभे होते. संध्याकाळी सातच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याकडे आल्या. भाडय़ाने मोटार घेऊन कात्रज येथे जायचे असल्याचे त्या दोघांनी सांगितले. कात्रज बाह्य़वळण मार्गावर आल्यानंतर कचरा डेपोपासून काही अंतरावर काळे यांना मोटार थांबविण्यास सांगण्यात आले. त्यानंतर दोघांनी काळे यांचे हात-पाय बेल्टने बांधले व त्यांना मारहाण केली. त्यांच्याजवळील सोन्याची अंगठी व रोख रकमेसह मोटार या चोरटय़ांनी पळवून नेली.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jan 2014 रोजी प्रकाशित
चालकाला मारहाण करून मोटारी चोरण्याच्या दोन घटना
रस्त्यामध्ये चालकाला मारहाण करून मोटारीसह त्यांच्या जवळील ऐवज चोरून नेण्याच्या दोन घटना शहरात घडल्या आहेत.
First published on: 24-01-2014 at 02:35 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car theft crime police