पुणे : अतिदक्षता विभागात वापरले जाणारे ‘काबरेपेनेम’ हे प्रतिजैविक बहुसंख्य भारतीय रुग्णांवर निरुपयोगी ठरणार असल्याची चिंता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) केलेल्या संशोधनातून याबाबतचे निष्कर्ष समोर आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रतिजैविकांच्या प्रतिरोधामुळे भारतातील रुग्णांच्या एका मोठय़ा गटावर काही विशिष्ट प्रतिजैविके संपूर्ण निरुपयोगी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामध्ये न्यूमोनिया आणि सेप्टिसिमिया आजारावर वापरल्या जाणाऱ्या काबरेपेनेमचा समावेश आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत आयसीएमआरकडून याबाबतचे संशोधन करण्यात आले असून अतिदक्षता विभागातील उपचारांदरम्यान वापरल्या जाणाऱ्या काही प्रमुख प्रतिजैविकांबाबत हा प्रतिरोध निर्माण झाल्याचे, तसेच या प्रतिरोधामध्ये दरवर्षी सुमारे पाच ते १० टक्के वाढ होत असल्याचे नोंदवण्यात आले आहे.

न्यूमोनिया आणि सेप्टिसिमिया यांसारख्या आजारांच्या रुग्णांना उपचारांसाठी अतिदक्षता विभागात दाखल केल्यानंतर दिले दाणारे कार्बापेनेम आणि त्या गटातील प्रतिजैविके प्रतिरोधक ठरत आहेत. त्यामुळे रुग्णांवर त्यांचा सकारात्मक परिणाम होणे दुरापास्त झाले आहे. प्रतिजैविक प्रतिरोध हा काळाबरोबर वाढत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे भविष्यातील कित्येक आजारांवर उपलब्ध औषधे संपूर्ण निरुपयोगी ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे. आयसीएमआरच्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कामिनी वालिया यांनी याबाबत माहिती दिली आहे. लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधातही भारतीयांवर प्रतिजैविके निरुपयोगी ठरण्याचे प्रमाण भविष्यात वाढणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. आयसीएमआरचे हे संशोधन लॅन्सेटच्या निष्कर्षांना बळ देणारे आहे.

८७.५ टक्के रुग्णांमध्ये प्रतिरोध

डॉ. वालिया म्हणाल्या, की प्रतिजैविकांच्या प्रतिरोधामुळे होणाऱ्या संक्रमणांवर उपचार करण्यासाठी कोणतीही नवीन प्रतिजैविके नाहीत. त्यामुळे आपल्याकडे उपलब्ध प्रतिजैविक औषधांचा विचारपूर्वक वापर करण्याचे आवाहन आहे. सध्या प्रतिजैविक प्रतिरोधाबरोबरच बुरशीविरुद्ध प्रतिकार पातळीतही वाढ होत आहे. विविध औषधांविरुद्ध प्रतिकारशक्ती (मल्टी ड्रग रेझिस्टन्स) वाढत असल्याने रोगांचे स्वरूपही बदलत असल्याचे डॉ. वालिया यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या संशोधनात ज्या रुग्णांचा अभ्यास करण्यात आला त्यांपैकी सुमारे ८७.५ टक्के रुग्णांमध्ये कार्बोपेनेम औषधाचा प्रतिरोध नोंदवण्यात आला आहे.

More Stories onऔषधेMedicine
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Carbapenem antibiotics useless for majority indians patients zws
First published on: 14-09-2022 at 05:28 IST