जड वाहनांमुळे शहरात ३३ प्राणांतिक अपघात
शहरात गेल्या नऊ महिन्यांत ट्रक तसेच डंपर अशा जड वाहनांच्या चालकांमुळे ३३ गंभीर अपघात झाले असून भरधाव डंपर चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
शहरातील मध्यभागाच्या तुलनेत उपनगरात जड वाहतुकीचे प्रमाण जास्त आहे. या भागातून शहराबाहेरून येणारी ट्रक तसेच डंपर अशी जड वाहने जातात. भरधाव डंपरचालकांच्या बेदरकारपणामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडले आहेत. विमाननगर भाग तसेच पुणे-नगर रस्त्यावर जड वाहनांना सकाळी नऊ ते रात्री दहा या वेळेत वाहनांना बंदी घालण्यात आली असून पोलिसांनी प्रवेश बंदीचे आदेश दिल्यानंतर दिवसा या भागातून वाहतूक करणाऱ्या डंपरचालकांवर विमानतळ वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी आणि त्यांच्या पथकाने नुकतीच कारवाई केली. प्रवेशबंदीची वेळ झुगारून या भागातून जाणाऱ्या आठ डंपरचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ५ लाख ७० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे (नियोजन) यांनी दिली.
शहरातील गंभीर स्वरूपाचे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत. शहरातील गंभीर स्वरूपाच्या अपघातांची संख्या कमी झाली आहे.उपनगरात डंपर, ट्रक अशा जड वाहनांमुळे अपघात झाले असल्याचे निरीक्षण पोलीस निरीक्षक शितोळे यांनी नोंदविले.
बेदरकारपणे ट्रक आणि डंपर अशी वाहने चालविणाऱ्या चालकांनी वेगमर्यादा पाळावी तसेच क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करू नये. जास्त क्षमतेचा माल वाहून नेल्यास अपघात होण्याची शक्यता असते. प्रवेशबंदीबाबत पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे. या पुढील काळात नियमभंग करणाऱ्या जड वाहनांवर कारवाई सुरूच राहणार आहे. – शुभदा शितोळे, वाहतूक विभाग, पोलीस निरीक्षक (नियोजन)