पुणे : आजची तरुण पिढी ही मोटारींकडे त्यांच्या स्मार्ट फोनप्रमाणे पाहत आहे. मोटारी या आपल्या स्मार्ट फोनचाच एक भाग असाव्यात, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे कृत्रिम प्रज्ञाधारित (एआय) साहाय्य, डिजिटल वैशिष्ट्ये आणि मनोरंजन या गोष्टींचा समावेश मोटारीत असावा, असा त्यांचा आग्रह आहे. भविष्यात मोटारी अधिकाधिक स्मार्ट बनणार असून, त्यात नियंत्रण करणारी संगणकीय प्रणाली केंद्रस्थानी असेल, असे प्रतिपादन मारुती सुझुकीचे कार्यकारी समिती सदस्य सी. व्ही. रमण यांनी शुक्रवारी केले.
‘सीआयआय’च्या वतीने आयोजित ‘नेक्सजेन मोबिलिटी शो २०२५’मध्ये ते बोलत होते. या परिषदेची संकल्पना भविष्यातील वाहनउद्योग ही आहे. वाहननिर्मिती क्षेत्रातील पुरवठा साखळीतील सर्व घटक या परिषदेत सहभागी झाले आहेत. त्यात वाहननिर्मिती कंपन्यांपासून इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील संशोधक, तंत्रज्ञान पुरवठादार आणि धोरणकर्त्यांचा समावेश आहे.
या परिषदेत टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी स्वेन पॅचुश्का म्हणाले, की भारतात संगणकीय प्रणालीच्या आधारे वाहन उद्योगात क्रांतिकारी बदल होत आहे. याकडे केवळ तंत्रज्ञान म्हणून नव्हे, तर ग्राहकांच्या दृष्टिकोनातून पाहावे लागेल. तरुण, डिजिटल आणि पर्यावरणदृष्ट्या सजग असलेली पिढी आता ग्राहक म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे त्यांच्या अपेक्षाही तशाच आहेत. या पिढीच्या अपेक्षांतून वाहन उद्योगाचा भविष्यातील प्रवास आकारास येणार आहे.
ऑटोमोटिव्ह टाटा एलेक्सीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी सुंदर गणपती म्हणाले, की संगणकीय प्रणाली आधारित वाहनांकडे होणारे स्थित्यंतर हे केवळ मोटारीमध्ये सॉफ्टवेअर कोड समाविष्ट करण्यापुरते मर्यादित नाही. त्यात वाहनाच्या संपूर्ण रचनेसह सर्वच गोष्टींत अत्याधुनिकता यायला हवी. उत्तर अमेरिका, युरोप, चीन आणि जपानकडून या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. यात भारत मोठी प्रगती करू शकतो. भारतातील कमी उत्पादन खर्च, कुशल मनुष्यबळ आणि संशोधन व विकासात सातत्याने होणारी वाढ ही कारणे यामागे आहेत. केवळ संगणक अभियंते भरती करून बदल घडणार नाही, तर त्यासाठी संपूर्ण संगणकीय प्रणाली परिसंस्था बनवावी लागेल. ही बाब वाहननिर्मिती कंपन्यांनी लक्षात घ्यावी.
वाहन उद्योग ३०० अब्ज डॉलरवर जाणार
देशातील वाहन उद्योगाची उलाढाल सध्या १३० अब्ज डॉलर आहे. या उद्योगाची उलाढाल २०३० पर्यंत ३०० अब्ज डॉलरवर जाण्याच्या अंदाज आहे. त्या वेळी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) वाहन उद्योगाचा वाटा १२ टक्के असेल. पुढील ५ वर्षांत एकट्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात २० अब्ज डॉलरची गुंतवणूक येणार असून, त्यातून ५० लाख रोजगारनिर्मिती होणार आहे, असा विश्वास परिषदेत व्यक्त करण्यात आला.