केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी यांच्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांना मारहाण करणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांवर डेक्कन पोलीस ठाण्यात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्मृती इराणी प्रमुख पाहुण्या असलेल्या कार्यक्रमामध्ये सोमवारी गोंधळ झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत तीव्र निदर्शने केली. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केल्याने सभागृहामध्ये अभूतपूर्व गोंधळ झाला. यामध्येच राष्ट्रवादीच्या माहिलांना भाजपा कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीने केलाय. या प्रकरणामध्ये तक्रारही दाखल करण्यात आली होती. याच तक्रारीची दखल घेत डेक्कन पोलिसांनी भस्मराज तीकोने ( रा.कसबा पेठ ) , प्रमोद कोंढरे( रा. नातू बाग), मयूर गांधी (शुक्रवार पेठ,) या भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांविरोधात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखला केलाय.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी स्मृती इराणी या प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. त्यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘भारतीय जनता पक्षाचा विजय असो’ आणि ‘जय श्रीराम’ या घोषणा देण्यात आल्या. त्याचवेळी बाल्कनीमधून ‘महात्मा गांधी की जय’ या घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी दिल्या. त्यामुळे कार्यक्रमात काही वेळ व्यत्यय आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां वैशाली नगवडे यांच्यासह पाच महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी या महिला कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याची तक्रार राष्ट्रवादीने केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रंगमंदिराच्या परिसरात काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली गॅस दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमापूर्वी स्मृती इराणी यांचा सेनापती बापट रस्त्यावरील एका तारांकित हॉटेलमध्ये कार्यक्रम होता. त्यापूर्वी महागाईच्या मुद्द्यांवर इराणी यांनी बोलावे, अशी मागणी करत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली  निदर्शने करण्यात आली. इराणी यांचा ताफा परत जात असताना त्यांच्या वाहनांवर अंडी फेकण्याचा प्रयत्न झाला.