पुणे : करारनाम्याचे उल्लंघन आणि मालकी हक्काची मिळकत परस्पर विकून १५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गॅलेक्सी कन्स्ट्रक्शन ॲण्ड कॉन्ट्रक्टर्सचे संचालक अशोक शिवनारायण थेपडे आणि अमित अशोक थेपडे (दोघेही रा. डी. २२, मंत्री किशोर पार्क, भोसलेनगर, गणेशखिंड रस्ता) यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार करणे, करारनाम्याचे उल्लंघन करून फसवणूक करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित थेपडे यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिक विजय अगरवाल यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट २००६ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत घडला. अगरवाल यांची सिद्धिविनायक दुर्गादेवी डेव्हलपर्स कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी आहे. कंपनीने २००० मध्ये पाषाण येथील २६ गुंठे जमीन जमीन करारनाम्याने विकसनासाठी घेतली होती. त्यांनी ही जमीन २००६ मध्ये गॅलेक्सी कन्स्ट्रक्शन ॲण्ड कॉन्ट्रक्टरच्या संचालकांना भागीदारीत कराराने विकसनासाठी दिली. करारानुसार बांधकाम गहाण ठेवणे किंवा त्यावर बॅंकेतून कर्ज काढण्याची परवानगी दिलेली नव्हती. तसेच, बांधकाम नकाशे मंजूर झाल्यापासून १५ महिन्यांत काम पूर्ण करून देण्याचे ठरले होते.

हेही वाचा – पुणे : गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहतीत कोयता गँगची दहशत; दोघांवर कोयत्याने वार; वाहनांची तोडफोड

हेही वाचा – नागपुरात शिट्टी वाजवल्यानंतर चर्चांना उधाण, भाजपात प्रवेश करणार का? अमोल कोल्हे म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करारनाम्यात ठरल्यानुसार बांधकाम पूर्ण करून दिले नाही. त्यामुळे मुदतवाढ दिली होती. तसेच, कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीस ताबा देण्याचे अधिकार कंपनीला दिले नव्हते. मात्र, गॅलेक्सी कन्स्ट्रक्शन कंपनीला दोन मजल्यांची परवानगी असताना, सात मजली इमारतीचा बनावट बांधकाम नकाशा तयार केला. त्याला महापालिकेने मंजुरी दिली आहे, असे भासवून पिंपरी चिंचवडमधील एका बॅंकेकडून त्यावर दोन टप्प्यांत २४ कोटींचे कर्ज घेतल्याचे उघडकीस आले. त्यात एका जामीनदाराच्या बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. तसेच अन्य एका बॅंकेकडूनही सुमारे ६ कोटी ५० लाखांचे कर्ज घेतले. अगरवाल यांच्या हिश्श्यातील चार कोटी रुपये किमतीचे दुकान आणि साडेदहा कोटी रुपये मूल्य असलेले कार्यालय थेपडे यांनी परस्पर विकले. त्यामुळे १५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक मनीष तुले तपास करत आहेत.