पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमधील नागरी समस्या प्रकर्षाने जाणवत आहेत. या प्रकरणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. मात्र, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पावले उचलली जात नसल्याची बाब विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत मंगळवारी उघड झाली. त्या वेळी कोणत्याही शासकीय यंत्रणेने काम न केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची तंबी विभागीय आयुक्तांनी दिली.

हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडीसह इतर नागरी समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचत असल्याने आयटी पार्कमधील काही परिसर जलमय झाला होता. यावरून मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्या वेळी त्यांनी विभागीय आयुक्तांना आयटी पार्कमधील उपाययोजनांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आयटी पार्कची पाहणी करून उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.

या पार्श्वभूमीवर, आयटी पार्क परिसरात सर्व शासकीय यंत्रणांकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी मंगळवारी घेतला. या बैठकीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. त्या वेळी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अद्याप कामे सुरू झाली नसल्याची बाब स्पष्ट झाली. त्यावर विभागीय आयुक्तांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ‘सर्वच शासकीय यंत्रणांची कामे करण्याची जबाबदारी असून, कोणी कामे न केल्यास त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल,’ असेही त्यांनी बजावले.

अतिक्रमणांवर कारवाई

या बैठकीत ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांचा अहवाल सादर केला. डॉ. म्हसे म्हणाले, ‘पीएमआरडीएकडून हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर कारवाई सुरू आहे. त्यात परिसरातील १६६ अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे. या भागातील सर्वच अतिक्रमणे काढण्यात येणार असून, त्या दृष्टीने सर्वेक्षण सुरू आहे.’

एमआयडीसी’कडून कारवाईला वेग

हिंजवडी आयटी पार्कमध्ये सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत ‘एमआयडीसी’चे मुख्य अभियंता नितीन वानखेडे म्हणाले, ‘एमआयडीसीने हिंजवडी टप्पा एकमधील १२ ठिकाणची अतिक्रमणे काढली आहेत. टप्पा दोनमधील ४ आणि टप्पा तीनमधील ३८ ठिकाणी अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे. याचबरोबर आयटी पार्क परिसरात रस्त्यांवरील राडारोडा हटवून ते साफ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयटी पार्क परिसरातील कामांमध्ये काही यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असेल आणि रस्त्याच्या दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण केली नाहीत, तर जिल्हाधिकाऱ्यांकडून आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. हिंजवडी परिसरातील प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावरची आढावा बैठक दर १५ दिवसांनी घेतली जाईल.- डॉ. चंद्रकात पुलकुंडवार, विभागीय आयुक्त