पुणे : शहरातील मद्य विक्री करणाऱ्या दुकानांचा दरवाजा उचकटून रोकड, तसेच मद्याच्या बाटल्या लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी नगर रस्त्यावरील वाघोली भागात असलेल्या एका मद्य विक्रीचा दरवाजा उचकटून दोन लाख ७० हजारांची रोकड, तसेच मोबाइल संच लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत सागर निरंजनकुमार बत्रा (वय ३३, रा. लुंकड स्काय लाऊंज, कल्याणीनगर, येरवडा) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बत्रा यांचे नगर रस्त्यावरील केसनंद फाटा येथे सागर वाईन्स हे मद्य विक्रीचे दुकान आहे. रविवारी (२१ जुलै) मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचा लोखंडी दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यातील दोन लाख ७० हजारांची रोकड आणि मोबाइल संच असा मुद्देमाल लांबवून चोरटे पसार झाले. सोमवारी सकाळी मद्य विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून गल्ल्यातील रोकड लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन तपास करत आहेत. वारजे माळवाडी भागातील एका मद्य विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरांनी गल्ल्यातील ११ हजारांची रोकड लांबविल्याची घटना शनिवारी (१९ जुलै) घडली. गेल्या पंधरा ते वीस दिवसांत कल्याणीनगर, येरवडा, कोंढवा भागातील मद्य विक्रीची दुकाने फोडून चोरट्यांनी मद्याच्या बाटल्या, तसेच रोकड लांबविल्याच्या घटना घडल्या. मद्यावरील कर वाढविल्यानंतर मद्याच्या दरात वाढ झाली आहे. मद्य दरवाढीनंतर शहरात मद्य विक्री दुकानातील रोकड, मद्याच्या बाटल्या लांबविण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.
पिसोळीत घरफोडी
कोंढव्यातील पिसोळी परिसरात एका घरातून चोरट्यांनी तीन लाख ५५ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत सचिन दत्तात्रय गोडावळे (वय ४५, रा. पिसोळी) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोडावळे यांचे पिसोळीतील दत्त मंदिराजवळ बैठे घर आहे. रविवारी (२० जुलै) सायंकाळी गोडावळे यांचे घर बंद होते. चोरट्यांनी घराचा पत्रा वाकविला. पत्रा वाकवून चोरटे घरात शिरले. चोरट्यांनी कपाटातील तीन लाख ५५ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले. रविवारी रात्री गोडावळे कुटुंबीय घरी आले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस निरीक्षक अब्दागिरे तपास करत आहेत.