पुणे : छत्रपती संभाजीनगर येथील एक तरुणी सासरच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. तर त्या तरुणीला कोथरूड येथील तीन तरुणींनी त्यांच्या फ्लॅटमध्ये एक दिवस राहू दिले. त्यानंतर ती तरुणी तेथून निघून गेली. त्याच दरम्यान त्या तरुणीच्या सासरच्या मंडळींनी सून हरवल्याची तक्रार दिल्यानंतर ती तरुणी पुण्यात असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर येथील पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर येथील पोलिस पुण्यात आले. त्यावेळी पुणे पोलिसांच्या कोथरूड येथील पोलिस स्टाफ सोबत घेऊन तीन तरुणींच्या फ्लॅटमध्ये जाऊन पाहणी केल्यावर त्या तिघींना पोलिस स्टेशनमध्ये जबाब नोंदविण्यास आणण्यात आले.
आमच्या तिघीसोबत पोलीस अधिकाऱ्यांनी जातीवाचक भाषा वापरली. आमची चूक नसताना पोलीस स्टेशनमध्ये बराच वेळ बसून ठेवले. आम्हाला नाहक त्रास देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित पोलिस अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आम्ही पोलिस आयुक्त कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करीत असल्याचे पीडित तरुणींनी सांगितले. त्या तरुणींची शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन त्यांच्या सोबत घडलेल्या घटनेची माहिती त्यांनी जाणून घेतली.
यावेळी रोहित पवार म्हणाले की, कोथरूड भागात राहणार्या तीन तरुणींची कोणत्याही प्रकारची चूक नसताना, पोलिस घरात घुसले आणि त्यांच्या सोबत चुकीच्या पद्धतीची भाषा वापरली. ज्या पोलिस अधिकाऱ्यांकडून अशी पद्धतीची भाषा वापरली गेली त्या अधिकार्यांवर करावईच्या मागणीसाठी या तरुणी कित्येक तास पोलिस आयुक्त कार्यालयाच्या दारात बसून आहे. या तरुणींच्या मागणीची दखल घेऊन पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलिस अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली