पिंपरी- चिंचवड : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ट्रेलर चालकाची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी गुंडाविरोधी पथकाने अवघ्या ४८ तासांमध्ये तीन आरोपींना जेरबंद केलं आहे. अमोल विकास पवार असं हत्या करण्यात आलेल्या ट्रेलर चालकाचे नाव आहे. तो इतर चालकांचा ट्रेलर चोरत असताना झालेल्या मारहाणी त्याचा मृत्यू झाला होता. आरोपींनी मुंबईच्या दिशेने पळ काढला होता. त्यांना अवघ्या काही तासातच अटक करण्यात आली आहे. दशरथ उर्फ सोनू जयराम अडसूळ, विष्णू अंगद राऊत आणि बळीराम वसंत जमदाडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण ट्रेलर चालक आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी अमोल पवारचा मृतदेह नग्न अवस्थेत म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या परिसरात आढळला, त्याची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं. याप्रकरणाचा तपास सुरू असताना गुंडाविरुद्ध पथकाचे पोलीस निरीक्षक हरीश माने हे त्यांच्या टीमसह आरोपींचा शोध घेत होते. अमोलच्या हातावर बंजारा असे गोंदलेले आढळले. निगडी पोलीस ठाण्यात अमोल बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. तक्रारदार रोहिदास राजेंद्र चव्हाण यांच्याकडे यासंबंधीची चौकशी आणि बंजारा गोंदलेला संबंधी सांगितलं असता तो बेपत्ता अमोल विकास पवार असल्याचं समोर आलं. तपासा दरम्यान गुंडा विरोधी पथकाला एक सीसीटीव्ही आढळला. मयत अमोल हा ट्रेलरमध्ये शिरतो आणि तो ट्रेलर चोरून नेण्यासाठी प्रयत्न करतो. ही बाब आरोपी ट्रेलर चालकांना समजताच त्यांच्यात आणि अमोलमध्ये झटापट झाली. झटापटीमध्ये गंभीर जखमी होऊन अमोल चा मृत्यू झाला. अमोलचा मृतदेह जवळच्या पटांगणात टाकून देण्यात आला, त्यानंतर तिघेही मुंबईच्या दिशेने ट्रेलर घेऊन पसार झाले. मात्र, अवघ्या काही तासातच गुंडाविरोधी पथकाने त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडमध्ये इंद्रायणी नदी संवर्धनासाठी ‘रेकॉर्ड ब्रेक’ सायकल रॅली!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्न गोरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश माने, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक हरिश माने, पोलीस अंमलदार हजरत पठाण, प्रवीण तापकीर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, विजय गंभीरे, सुनील चौधरी, नितीन गेंगजे, श्याम बाबा, रामदास मोहिते, शुभम कदम, तहसील शेख, नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.