पुण्यातील मध्य वस्तीत, अतिशय वर्दळीच्या जागी असूनही अतिशय शांत वातावरण असलेले ‘चर्च ऑफ होली एंजल्स’ आपले शताब्दी वर्ष साजरे करत आहे.
रास्ता पेठेतील अंध शाळेसमोर हे टुमदार चर्च आहे. पुण्यातील हा भाग तसे पाहिल्यास विविध धर्माच्या प्रार्थनास्थळांनी गजबजलेला आहे. मात्र कोणत्याही वादात न पडता हे चर्च कायमच प्रसिध्दीपासून दूर  राहिलेले आहे. या चर्चची उभारणी १९०७ ते १९१५ या कालावधीत झालेली आहे. या चर्चचे सभासद असलेल्या कुशल कारागिरांनीच या चर्चचे बांधकाम केले आहे. या चर्चचे पहिले मिशनरी धर्मगुरू रेव्हरेंड निकोलसन, तर रेव्हरेंड वसंत डेव्हिड हे पहिले मराठी धर्मगुरू होते. रेव्हरेंड भास्करराव सावंत यांनी ३० वर्षे धर्मगुरू म्हणून सेवा केल्यामुळे हे चर्च ‘सावंत पाळकांचे’ चर्च म्हणून परिचित होते. सध्या रेव्हरेंड देवदान मकासरे हे धर्मगुरू आहेत. अशा चर्चची शताब्दी विविध कार्यक्रमांद्वारे साजरी केली जात आहे, अशी माहिती चर्चतर्फे देण्यात आली.