बारामती : ‘काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचे बळी घेतले आहेत. या हल्ल्याचा बदला घेतला पाहिजे, असे अनेकांचे म्हणणे आहे. याबाबत केंद्र सरकारने लक्ष घातले असून, निर्णय घेतला जाईल.’ असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री पवार हे गुरुवारी बारामती दौऱ्यावर होते. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती अजित पवारांच्या उपस्थितीत झाल्या. यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे, पृथ्वीराज जाचक, किरण गुजर उपस्थित होते. त्यावेळी पवार बोलत होते.

पवार म्हणाले, ‘अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला आहे. पाकिस्तानलाही जरब बसावी यासाठी याचा बदला घेतला पाहिजे, असे अनेकांचे म्हणणे आहे. याबाबत केंद्र सरकारने लक्ष घातले आहे. त्यानुसार निर्णय घेतला जाईल. या हल्ल्यानंतर देश एकजूट झाल्याचे चित्र जगभर निर्माण झाले आहे. जगभरातील अनेक नेत्यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जागतिक पातळीवर हल्लेखोरांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे.’ ‘काश्मीरमध्ये घडलेल्या घटनेनंतर पर्यटकांना राज्यात आणण्यासाठी पयत्न करण्यात येत आहेत. अनेक पर्यटकांना विमान, रेल्वेने आणण्याचे काम सुरू आहे. पर्यटकांचा एक गट विमानाने परतीकडे निघाला असताना त्यांंच्याशी संपर्क साधला आहे.’ असे पवार यांनी सांगितले.