पुणे : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मान्य केलेल्या शुल्कापेक्षा महाविद्यालयांनी शुल्क आकारल्यास आता विद्यार्थ्यांना त्याबाबत ऑनलाइन तक्रार करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी शुल्काची पावती, नोटिस, पत्रव्यवहार आणि संबंधित पुरावे दिल्यास राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) महाविद्यालयाची चौकशी करण्यात येणार आहे.
राज्यात अभियांत्रिकी, औषधनिर्माण, वास्तुकला, व्यवस्थापन, संगणकशास्त्र, विधी अशा व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमांची शुल्क निश्चिती शुल्क नियामक प्राधिकरणाद्वारे (एफआरए) केली जाते. सीईटी सेलकडून सध्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. काही महाविद्यालये ‘डेव्हलपमेंट फंड’, देखभाल शुल्क, अनामत शुल्काच्या नावाखाली जास्तीचे शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी येतात. या पार्श्वभूमीवर, ठरवलेल्या रकमेपेक्षा अधिक शुल्क; तसेच अनामत रक्कम घेतल्यास, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शुल्क नियामक प्राधिकरणाने (एफआरए) दिला आहे. तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागानेही शुल्काबाबतच्या सूचना काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केल्या. त्यानुसार सर्व अभ्यासक्रमांच्या प्रत्येक वर्षासाठी शुल्क नियामक प्राधिकरण, शुल्क निश्चिती समिती यांनी निर्धारित केलेले अभ्यासक्रमनिहाय शुल्क विद्यार्थी, पालकांच्या निदर्शनास येईल, अशा पद्धतीने मराठी आणि इंग्रजीमध्ये संकेतस्थळावर, सूचना फलकावर प्रदर्शित करणे अनिवार्य आहे.
विद्यार्थ्यांकडून कोणत्याही परिस्थितीत शुल्क नियामक प्राधिकरण, शुल्क निश्चिती समितीने निर्धारित केलेल्या शुल्कापेक्षा अधिकचे शुल्क आकारण्यात येऊ नये. तसेच, एका शैक्षणिक वर्षात एका वर्षाच्या शुल्कापेक्षा अधिकचे शुल्क आकारण्यात येऊ नये. शासनाच्या योजनेच्या लाभासाठी पात्र विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणारी शिष्यवृत्ती विचारात घेऊन विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम वजा करून उर्वरित शुल्काची रक्कमच विद्यार्थ्यांकडून आकारावी असे स्पष्ट करण्यात आले होते. त्याशिवाय अधिकच्या शुल्काबाबत तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश सीईटी सेलला देण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने विद्यार्थ्यांना शुल्काबाबत ऑनलाइन तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना https://portal.maharashtracet.org या संकेतस्थळावर तक्रार करता येईल. तसेच ७७००९१९८९४ या क्रमांकावर सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत (सार्वजनिक सुटी वगळून) तक्रार नोंदवता येणार आहे. तक्रारीमध्ये विद्यार्थ्याचे नाव, महाविद्यालयाचे नाव, अभ्यासक्रमाचे नाव, शुल्कासंबंधी तपशील स्पष्ट नमूद करावा, असे सीईटी सेलने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.