पिंपरी- चिंचवड: चाकण येथील दरोड्याप्रकरणी चाकण पोलिसांनी सात दरोडेखोरांना अटक केली आहे. गंभीर बाब म्हणजे यात अल्पवयीन मुलाचादेखील सहभाग आहे. दरोड्यातील सोन्याचे दागिने विकत घेणाऱ्या सोनाऱ्याला आणि आरोपींना आश्रय देणाऱ्या दोघांनादेखील गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
आरोपीकडून एकूण १२ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. परश्या गौतम काळे, सचिन चंदर भोसले, भीमा आदेश काळे, राजेश अशोक काळे, धंग्या चंदर भोसले, अक्षय उर्फ किशोर हस्तलाल काळे अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नाव आहेत. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.
फेब्रुवारी महिन्यात चाकणमधील शेल पिंपळगाव आणि बहुल गावात दरोडा टाकणाऱ्या कुख्यात टोळीला पिंपरी- चिंचवडच्या चाकण पोलिसांनी अटक केली आहे. बहुल येथे पाच ते सहाजणांच्या दरोडेखोऱ्यांच्या टोळीने बंद दरवाजाची कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करून दरोड्यासाठी विरोध करणाऱ्या वाडेकर कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती.
आरडाओरडा केल्याने अशोक वाडेकर आणि उज्वला वाडेकर यांच्या पोटात धारदार हत्याराने वार केले होते. याच प्रकारे दरोडेखोरांनी शेल पिंपळगाव येथे अनिकेत दौडकर यांच्या घरावर दरोडा टाकला होता. दोन्ही दरोड्यात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली होती. या प्रकरणाचा तपास चाकण पोलीस करत होते.
पोलीस आयुक्त विण्यकुमार चौबे यांच्या कडक सूचनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलिसांनी एक टीम तयार करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांच्यावर जबाबदारी दिली. प्रसन्न जऱ्हाड यांच्या टीमने सलग १५ दिवस अहिल्यानगर येथे राहून तपास केला. बीडमधील आष्टी, पाटोदा या ठिकाणीही गुन्ह्याचा तपास करण्यात आला. अखेर या प्रकरणी सहाजणांना अटक करण्यात आली. तर, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं. दरोडेखोरांकडे आधी सखोल चौकशी करण्यात आली. माहिती देत नसल्याने पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच दरोडेखोरांनी गुन्ह्याची कबुली दिली.
दरेडेखोरांनी चोरीतील सोन्याचे दागिने आरोपी सोनार अभय विजय पंडितला आणि गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्या आणि लपवून ठेवणाऱ्या गणेश शिवाजी काळेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात चाकण पोलीस ठाण्यातील सहा गुन्हे उघड झाले आहेत. चाकण पोलिसांनी १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात १३ तोळे सोन्याचा समावेश आहे.