पुणे/ मुंबई : प्रतिकूल स्थितीमुळे र्नैऋत्य मोसमी वारे श्रीलंकेच्या किनारपट्टीसह परिसरात अडकले आहेत.  हे वारे जूनच्या पहिल्या आठवडय़ात भारतात दाखल होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मुंबईसह राज्याच्या काही भागांत पावसाच्या काही सरी बरसल्या. मात्र, हा मोसमी पूर्व पाऊसच आहे. त्याला मोसमी पाऊस म्हणता येणार नसल्याचेही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची, तर काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबईत सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटेच्या सुमारास काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यानंतर, दुपारच्या सुमारास मुंबईकरांना पुन्हा उन्हाचा सामना करावा लागला. मुंबईत परळ, माझगाव, भायखळा, माटुंगा, शिवडी या भागात पाऊस पडला.  वाढीव आद्र्रता आणि रात्रीचे तापमान तुलनेने कमी झाल्याने मुंबईत पावसाच्या सरी पडल्या. कोकण-गोव्यात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ तर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात बऱ्याच ठिकाणी किंचित घट झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. कोकण आणि गोवा पट्टय़ात २८ मेपर्यंत काही भागात तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता जूनच्या पहिल्या आठवडय़ात र्नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील. त्यानंतर कोकणमार्गे महाराष्ट्र आणि मुंबई परिसरात हे वारे पोहोचतील. बुधवारी (२५ मे) विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुरुवारी (२६ मे) विदर्भातील गोंदिया जिल्हा सोडून उर्वरित सर्वच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे, तर शुक्रवारी (२७ मे) विदर्भातील भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात पुढील तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या उत्तर पूर्व भागापासून ते उत्तर पूर्व अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.