बाणेर, हडपसर- काळेपडळ, धनकवडी पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव विचाराधीन; ग्रामीण भागातील लोणीकंद, लोणीकाळभोर, हवेली पोलीस ठाण्याचा समावेश
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या रखडलेल्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंगळवारी मंजुरी दिली. पुणे पोलीस दलातील हिंजवडी, दिघी पोलीस ठाण्याचा भाग पिंपरी पोलीस दलात समाविष्ट करण्यात येणार आहे. मात्र, चतु:शंृगी पोलीस ठाणे पुणे पोलिसांकडे राहणार आहे. हिंजवडीनजीक असलेला बालेवाडी, बाणेर आणि म्हाळुंगे हा भाग एकत्र करून नवीन बाणेर पोलीस ठाण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच धनकवडी, हडपसर पोलीस ठाण्याचे विभाजन करून काळेपडळ पोलीस ठाण्याच्या निर्मितीचा प्रस्ताव विचाराधीन आहे. नगर रस्त्यावरील वाघोली भाग तसेच लोणीकाळभोर पोलीस ठाणे पुणे पोलीस दलात समाविष्ट करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला मंजुरी मिळाल्यानंतर पुणे पोलीस दल तसेच पुणे ग्रामीण पोलीस दलातील २२०७ पोलीस कर्मचाऱ्यांना पिंपरीत वर्ग केले जाणार आहे. नवीन पिंपरी पोलीस आयुक्तालयासाठी अधिकारी आणि कर्मचारी मिळून ४ हजार ८४० कर्मचाऱ्यांची गरज आहे. नव्याने निर्माण करण्यात येणारी पदे टप्याटप्याने भरली जाणार आहेत. नवीन पोलीस आयुक्तालयासाठी जागेची पाहणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या एक मेपासून पिंपरी आयुक्तालयाची निर्मिती तसेच कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे. पिंपरी आयुक्तालयाची निर्मिती झाल्यानंतर पुणे पोलीस दलातही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील तीन पोलीस ठाण्यांचा समावेश पुणे पोलीस आयुक्तालयात केला जाणार आहे. बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे भागांतील नागरिकांसाठी हिंजवडी पोलीस ठाणे तसे लांब आहे. त्यामुळे नवीन बाणेर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. बाणेर पोलीस ठाणे निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
हिंजवडी पोलीस ठाण्याचा समावेश पिंपरीत करण्यात आला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावधन भाग येतो. त्यामुळे बावधन, बालेवाडीतील श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल तसेच मुंबई-बंगळुरु बाह्य़वळण मार्गाचा काही भाग बाणेर पोलीस ठाण्यात समाविष्ट केला जाणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर या दोन्ही शहरांमधून मुळा नदी वाहते. मुळा नदी ही दोन्ही पोलीस आयुक्तालयांची सीमारेषा असेल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. ग्रामीण पोलीस दलातील लोणीकाळभोर, हवेली आणि लोणीकंद पोलीस ठाण्यांचा समावेश पुणे पोलीस दलात करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
नव्याने पोलीस ठाण्यांची निर्मिती
पिंपरी पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाल्यानंतर बाणेर, हडपसमधील काळेपडळ, धनकवडी येथे नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे विभाजन करून स्वतंत्र काळेपडळ पोलीस ठाण्याची निर्मिती तसेच सहकारनगर पोलीस ठाण्याचे विभाजन करून धनकवडी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. बाणेर, धनकवडी, हडपसर भाग हा राजकीयदृष्टय़ा संवेदनशील आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांपूर्वीच या पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्याची गरज आहे. शासनाकडून पिंपरी आयुक्तालयाला मान्यता दिली असली तरी पुणे पोलीस दलात मोठे फेरबदल करावे लागणार आहे, याचे भान शासनाने ठेवण्याची गरज आहे. नवीन पोलीस ठाण्याच्या निर्मितीसाठी शासनाला फारसा खर्च येणार नाही. उपलब्ध मनुष्यबळात नवीन पोलीस ठाण्याचे काम सुरू करता येईल. त्यानंतर अंदाजपत्रकात नव्याने काही आर्थिक तरतुदी कराव्या लागतील. ग्रामीण पोलीस दलातील लोणीकाळभोर, लोणीकंद, सिंहगड रस्त्यावरील हवेली पोलीस ठाणे पुण्यात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
सहपोलीस आयुक्तपदात बदल नाही
पुणे पोलीस दलातील सहपोलीस आयुक्तपद जैसे थे राहणार आहे. अस्तित्वात असलेल्या पदांना काही धक्का पोहचणार नाही. फक्त काही पदे रिक्त ठेवण्यात येतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांची फक्त एक किंवा दोन पदे रिक्त राहतील, अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
