लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: माहिती व तंत्रज्ञाननगरी हिंजवडीत छोट्या वाहनांसह अवजड वाहनांची ये-जा वाढली आहे. मेट्रोचेही काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. त्यासाठी हिंजवडी विभागातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याबाबतचा आदेश पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी प्रसृत केले आहेत.
मारुंजी वाय जंक्शन, भूमकर चौक, काळा खडक येथून हिंजवडी माहिती व तंत्रज्ञान नगरीकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. काळा खडक येथील चौकात अवजड वाहने वळण घेण्यासाठी येतात. परिणामी, मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
आणखी वाचा-रेल्वेत अस्वस्थ वाटतंय? आता आपत्कालीन प्रसंगी प्रवाशावर स्थानकातच उपचार
मारुंजी वाय जंक्शन येथील उजवीकडील ‘यू-टर्न’ बंद करण्यात आला आहे. लक्ष्मी चौकाकडे जाणारी वाहतूक कस्तुरी चौकमार्गे विनोदे कॉर्नर येथून इच्छितस्थळी जाऊ शकते. मारुंजी वाय जंक्शन ते कस्तुरी चौक एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. कस्तुरी चौकाकडून मारुंजी वाय जंक्शनकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. कस्तुरी चौकातून विनोदे कॉर्नरमार्गे मारुंजी वाय जंक्शनकडे वळविण्यात आली आहे.
वाकड कावेरीनगर येथील भुयारी मार्गातून दुचाकी, रिक्षा वगळून सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. कावेरीनगर, वेणूनगरकडून काळेवाडी फाट्याकडे जाणाऱ्या वाहनांना गुजरनगर भुयारी मार्गातून जाता येईल. १६ नंबरकडून जाणाऱ्या वाहनांना काळेवाडी फाटा येथून जाता येणार आहे. पिंपळे सौदागर येथील वर्दळीच्या शिवसाई लेन, गोविंद यशदा चौकाजवळ पी वन- पी टू झोन घोषित करण्यात आले आहे.
आणखी वाचा- मोटारी भाड्याने देणाऱ्या कंपनीची फसवणूक…पाकिस्तानी सीमेजवळील गावात विक्री
कोकणे चौकात वाहन उभे करण्यास मनाई
कोकणे चौक ते पार्क स्ट्रीट गृहनिर्माण सोसायटी दरम्यान दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ असते. रस्त्याकडेला वाहन उभे केले जाते. त्यामुळे वाहतूककोंडी होते. किरकोळ, गंभीर स्वरूपाचे अपघात होतात. त्यामुळे कोकणे चौक, रघुनाथ गोडांबे चौक, कोकणे चौक चौपटीपर्यंत सेवा रस्ता हा विनावाहनतळ परिसर म्हणून घोषित करण्यात आला आहे.