पुणे : महापालिकेच्या भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेंतर्गत विमाननगर, लोहगाव, हरणतळे, धानोरी, तसेच कलवड या ठिकाणी बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या नव्याने कार्यान्वित केल्या जाणार आहेत. त्यामुळे भामा आसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागांतील पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल केला जाणार आहे. पहाटे सहा ते अकरा या वेळेत होणारा पाणीपुरवठा आता रात्री, मध्यरात्री आणि सकाळी अशा तीन टप्प्यांत केला जाणार आहे.
हा बदल नियमित करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर येत्या गुरुवारपासून (३१ जुलै) पाणी पुरवठ्याच्या वेळेमध्ये बदल करून त्यानुसार पाणीपुरवठा केला जाणार आहे. हा बदल नागरिकांच्या लक्षात येईपर्यंत काही प्रमाणात नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असल्याचे बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एकनाथ गाडेकर यांनी सांगितले.
पाणीपुरवठ्याच्या वेळेत होणाऱ्या बदलामुळे विश्रांतवाडी, धानोरी, टिंगरेनगर, लोहगाव, विमाननगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, नागपूर चाळ, वडगाव शेरी, खराडी, चंदननगर भागातील नागरिकांना नवीन वेळेनुसार पाणीपुरवठा होणार आहे.धानोरी गावठाण भागात सध्या पहाटे सहा ते दुपारी तीन या वेळेत पाणीपुरवठा होतो. तो आता रात्री पावणेनऊ ते साडेअकरा, पहाटे पावणेपाच ते दहा आणि दुपारी तीन ते रात्री दहा अशा तीन टप्प्यांत होणार आहे.
भैरवनगर, गोकुळनगर, मुंजाबा वस्ती भागाला पहाटे चार ते अकरा, दुपारी बारा ते दीड या वेळेत, आनंद पार्क भागाला दुपारी तीन ते सायंकाळी सहा आणि रात्री सात ते पावणेबारा या काळात पाणी दिले जाणार आहे.खेसे पार्क, तुषार पार्क, धानोरी जकातनाका, कलवड या भागाला अनुक्रमे सायंकाळी सव्वासात ते रात्री अकरा, दुपारी तीन ते रात्री साडेदहा, पहाटे सव्वाचार ते पावणेआठ आणि पावणेबारा ते दुपारी सव्वा तीन या नवीन वेळेत पाणी मिळणार आहे.
नागपूर चाळ, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, कारागृह रस्ता या भागाला पहाटे सहा ते साडेनऊ-साडेबारा, पहाटे पाच ते पावणेआठ, पहाटे सहा ते सायंकाळी सहा या वेळेत पाणी दिले जाणार आहे. तर रामनगर भागात सकाळी दहा ते दुपारी अडीच, गलांडेनगरला रात्री सात ते अकरा, वडगाव शेरी भागात दुपारी पावणेचार ते सायंकाळी सव्वासहा, मिलिट्री परिसर आणि शुभम सोसायटी भागात सायंकाळी सहा ते रात्री अकरा या वेळेत पाणी दिले जाणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.