पुणे : भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारकाच्या वास्तूचे नामकरण ‘सावित्रीबाई फुले मुलींची पहिली शाळा’ असे करावे, अशी सूचना राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी केली. या स्थळाचे महत्त्व लक्षात घेता मुलींना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यातून शिक्षणाची प्रेरणा मिळेल, असे स्मारक भिडेवाडा येथे उभारण्यात येईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “केंद्राच्या मंजुरीनंतर स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गिकेसाठी तातडीने निधी”, अजित पवार यांची ग्वाही

भिडेवाडा येथे महापालिकेच्या वतीने राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासंदर्भात चार आराखडे सादर करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी सहा वाजता भिडेवाडा परिसराला भेट दिली. त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सहभागी झाले होते. त्यावेळी भुजबळ यांनी ही सूचना केली. तर अजित पवार यांनीही आधुनिक आणि जुन्या काळाचा योग्य समन्वय साधत स्मारकाचा आराखडा करावा, अशी सूचना केली.

मुलींची पहिली शाळा म्हणून भिडेवाड्याचे महत्त्व असल्याने याठिकाणी आधुनिक पद्धतीची मुलींची शाळा असावी. शाळेत अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा असाव्यात. इमारतीचा दर्शनी भाग जुन्या काळातील वाटावा. इमारतीत सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती देणारी शिल्पे असावी. मुली स्पर्धा परीक्षेसाठी तयार व्हाव्यात, यासाठी आवश्यक सुविधा येथे देण्यात याव्यात. मराठी आणि इंग्रजीतील आदर्श शिक्षकांची समिती तयार करून इथे देण्यात येणाऱ्या शिक्षणावर लक्ष ठेवण्यात यावे. स्मारकात परदेशी पर्यटकांना माहिती देण्याची व्यवस्था असावी. या वास्तूचे ‘सावित्रीबाई फुले मुलींची पहिली शाळा’ असे नामकरण करण्यात यावे, अशी सूचना भुजबळ यांनी केली.

हेही वाचा >>> पुणे: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारासाठी शंभर कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

दरम्यान, भिडेवाडा परिसराची पाहणी अजित पवार यांनी केली. भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत मुलींसाठी अत्याधुनिक प्रशिक्षणाची सुविधा करण्याचा विचार करावा. जागेची मर्यादा लक्षात घेऊन आराखडा तयार करावा. याबाबत लवकरच बैठक घेऊन आराखड्याचे स्वरूप निश्चित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. स्मारकाची इमारत बाहेरून जुन्या काळातील वाटेल आणि आतल्या बाजूने सुसज्ज असेल, अशी व्यवस्था करावी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रेरक कार्य लक्षात घेऊन स्मारकाचा आराखडा करावा. भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या स्थळाचे महत्त्व लक्षात घेता मुलींना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यातून शिक्षणाची प्रेरणा मिळेल असे स्मारक भिडेवाडा येथे उभारण्यात येईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal demand savitribai phule girls first school name to memorial at bhidewada pune print news apk 13 zws
First published on: 23-12-2023 at 22:31 IST