पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘हिजवडी आयटी पार्क’ला समस्यांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आता राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयटी फोरम आणि सोसायटी फेडरेशनसह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, संबंधित विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी यांची गुरुवारी मंत्रालयात बैठक होणार आहे.

हिंजवडी आयटी पार्क यावर्षी पहिल्याच पावसात अक्षरश: ‘वॉटर पार्क’ झाला. वाहतूक कोंडी, पायाभूत सोयी-सुविधांचा अभाव आणि वीज समस्यांमुळे या आयटी पार्कमधील आयटीयन्स आणि विविध कंपन्यांचे अधिकारी अक्षरश: हैराण झाले आहेत. त्यामुळे आयटीयन्स आणि सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून ‘अनलॉग हिंजवडी’ असे स्वाक्षरी अभियान राबवले होते. या अभियानाला सुमारे ३० हजार आयटीयन्सनी पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, हिंजवडी आयटी पार्कच्या समस्यांबाबत ठोस उपाययोजना करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये एमआयडीसी, जिल्हा परिषद, पीएमआरडीए, महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अशा सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसह आयटी फोरम आणि सोसायटी फेडरेशनच्या प्रतिनिधींची सविस्तर आढावा बैठक घ्यावी, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली होती. त्यानुसार, गुरूवारी, १० जुलै रोजी दुपारी दोन वाजता मंत्रीमंडळ, सभागृह, विधानभवन येथे बैठकीचे नियोजन केले आहे. या बैठकीत आयटीयन्स आणि सोसायटी फेडरेशनच्या प्रतिनिधींना बाजू मांडता येणार आहे. तसेच, प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंजवडी आयटी पार्कमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून सुमारे पाच लाख आयटी कर्मचारी व अधिकारी नियमित ये-जा करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. तसेच, एमआयडीसी, जिल्हा परिषद, पीएमआरडीए, महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अशा विविध विभागांमध्ये सक्षम समन्वय नाही. त्यामुळे पायाभूत सोयी-सुविधांचा प्रश्न निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा आयटी पार्क पण सुविधांअभावी जगभरात शहराची प्रतिमा मलीन होते आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करावा, अशी विनंती केली आहे. त्याबाबत बैठकीमध्ये निश्चितपणे ठोस निर्णय होईल, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.