पिंपरी : मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे उद्या (गुरुवारी) पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवडच्या बालेकिल्ल्यात येणार आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे भूमिपूजन यासह महापालिकेच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन, लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

पिंपरी-चिंचवड शहर पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु, भाजपने २०१७ मध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उध्वस्त केला. महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता होती. भोसरीत महेश लांडगे आणि चिंचवडमध्ये शंकर जगताप भाजपचे आमदार आहेत. तर, अमित गोरखे, उमा खापरे यांना विधानपरिषदेची आमदारकी दिली. शहरातीलच अनुप मोरे यांच्याकडे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले आहे. त्यामुळे शहरावर भाजपचे लक्ष केंद्रित केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांचेकडे आहे. त्यांनी पुन्हा शहरातील राजकारणात लक्ष घातले आहे. नुकतेच महापालिकेच्या अपंगांच्या पर्पल महोत्सवाला पवार यांनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी शहरात येणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिंपरी येथील सुविधा भुखंडावर उभारण्यात येणारे मध्यवर्ती अग्निशमन केंद्र आणि अग्निशमन प्रबोधिनी इमारत, आकुर्डी प्राधिकरण येथील डॉ. हेडगेवार भवन जवळ उभारण्यात येणारे अग्निशमन केंद्र, मधुबन हॉटेल ते इंदिरा रोड (२४ मीटर डी.पी रस्ता) व सिल्वर स्पून हॉटेल ते इंदिरा रोड (१८ मीटर डी.पी रस्ता) तसेच या दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या वाकड शिवेपर्यंतचा १८ मीटर रुंदीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण तसेच पवना नदीवरील मामुर्डी ते सांगवडे दरम्यान जोडणारा पूल या विकासकामांचा समावेश आहे. भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) मध्ये विकसित केलेली संगणक प्रणाली तसेच चिंचवड येथील तालेरा रुग्णालयाची नवीन इमारत, शहरातील विविध ठिकाणी टाकाऊपासून टिकाऊ (वेस्ट टू वंडर) वस्तूंपासून निर्मिती केलेल्या टिकाऊ कलाकृती, महापालिकेच्या विविध प्रशासकीय इमारतींवर बसविण्यात आलेले रुफ टॉप सोलर सिस्टीम (सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प), सिटी हब फॉर डेटा कम्युनिकेशन उपक्रम यांचा समावेश आहे.