पुणे : तीन वर्षांच्या बालकाने खेळताना अनावधानाने टोकदार वस्तू गिळली. त्याच्या पोटात दुखू लागल्याने पालकांनी त्याला रुग्णालयात हलविले. त्यावेळी तपासणीत त्याच्या पोटात छोट्या आतड्याच्या मध्यभागी टोकदार वस्तू अडकल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोटाच्या आतील भागालाही इजा झाली होती. डॉक्टरांनी एंडोस्कोपी प्रक्रियेद्वारे ही वस्तू काढल्यानंतर ती चुंबक असल्याचे निदर्शनास आले.
या मुलाने चुंबक गिळल्यानंतर त्याच्या पोटात तीव्र दुखू लागले. त्यामुळे पालकांनी त्याला रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केले. या मुलाच्या तपासणीत छोट्या आतड्याच्या मध्यभागी एक वस्तू अडकल्याचे आढळले. या वस्तूला तीक्ष्ण धातूचे आवरण असल्याने पोट, अन्ननलिका, आतड्याचा सुरूवातीचा भाग यासह आतड्याच्या मार्गामध्ये अनेक ठिकाणी पेशींच्या आवरणाला इजा पोहोचली होती. पोटविकारतज्ज्ञांसह वैद्यकीय पथकाने ही वस्तू एंडोस्कोपिक प्रक्रियेद्वारे बाहेर काढली. यामुळे मुलावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागली नाही.
या प्रक्रियेनंतर मुलाला तोंडावाटे २४ तास काहीही खाण्यास देण्यात आले नाही. त्याच्या छातीचा एक्स-रे आणि ओटीपोटाची अल्ट्रासाऊंड तपासणी करण्यात आली. त्यात शरीरात काही छिद्रे नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मुलाला हळूहळू द्रवपदार्थ देण्यात आले आणि पुढील तीन दिवसांत मऊ पदार्थ देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
याबाबत रूबी हॉल क्लिनिकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.परवेझ ग्रांट म्हणाले की, या घटनेमुळे लहान मुले असलेल्या पालकांनी मुलांच्या अवतीभवती छोट्या वस्तू असल्यास काळजी घ्यावी. पालकांनी आपल्या मुलांमध्ये पोटात दुखणे, मळमळ, उलट्या किंवा ताप यासारखी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.
उपचार कसे झाले…
रूबी हॉल क्लिनिकमधील पोटविकारतज्ज्ञ डॉ.नरेंद्र चोपडे म्हणाले की, मुलाच्या छोट्या आतड्यात चुंबक अडकल्यामुळे गुंतागुंतीची स्थिती निर्माण झाली होती. या वस्तूच्या तीक्ष्ण कडांमुळे आणि ती आतड्यात खोलवर गेल्यामुळे आतील पेशींना नुकसान होण्याचा मोठा धोका होता. एंडोस्कोपिक प्रक्रिया यशस्वी झाली नसती तर लॅपॅरोटॉमी ही खुली शस्त्रक्रिया करावी लागली असती. मात्र यामुळे दीर्घकालीन समस्या आणि पोटात मोठा व्रण राहिला असता. एंडोस्कोपी प्रक्रियेद्वारे चुंबक काढण्यात यश आल्याने पुढील गुंतागुंत टळली आणि मुलगा लवकर बरा होण्यासही मदत झाली.