जेजुरी : पुरंदर तालुक्यातील गुळुंचे गावात रविवारी दुपारी दीड वाजता बालविवाह सुरू असल्याची माहिती समजताच जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बालविवाह रोखला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुळुंचे गावामध्ये बालविवाह होत असल्याची माहिती गावच्या पोलीस पाटलांना समजल्याने त्यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात याबाबत कळविले होते. पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन विवाह रोखला. त्यावेळी विवाहाची शेवटची मंगलाष्टका सुरू होती. मात्र, वेळीच पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने अल्पवयीन मुलीचा होणारा विवाह टळला.
पोलिसांनी कागदपत्रे तपासली असता, मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे आढळून आले. त्यानंतर पाच जणांविरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली हरिश्चंद्र करे अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, बालविवाह रोखण्यासाठी गाव स्तरावर बालसंरक्षण समितीची स्थापना करण्याचे राज्य सरकारचे आदेश आहेत. मात्र, अद्यापही बालविवाहाच्या घटना घडत असल्याचे या निमित्ताने उघडकीस आले आहे.