पुणे : वीजपुरवठा खंडित झाल्याने हिंजवडी-मारूंजी-जांभे परिसरातील नागरी जीवन रविवारपासून विस्कळीत झाले होते. मागील चार दिवसांत केवळ चार तास वीजपुरवठा करण्यात आल्याने रोजची कामे करणेही अवघड झाले होेते, अशी तक्रार रहिवाशांनी केली. कित्येक तास वीज नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून सांगितले. पर्यायी मार्गाने नागरिकांना वीजपुरवठा करण्यात आला होता, तसेच बुधवारी बिघाड दुरूस्त झाल्यानंतर परिसरातील वीजपुरवठा सुरळीत झाल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

मारूंजी परिसरातील रहिवासी श्रीकांत शेळके सांगतात, ‘रविवारी (६ जुलै) सकाळी वीज यंत्रणेत बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, बुधवारची (९ जुलै) दुपार उलटूनही वीज सुरू झाली नाही. चार दिवसांत केवळ मंगळवारी सायंकाळी चार ते आठ या कालावधीत वीज सुरू होती. त्यामुळे रोजची कामे करताना अनेक अडथळे निर्माण झाले होते. मुलांना सकाळी शाळेत सोडण्यापासून, घरातील इतर कामे करणे अवघड झाले होते.’

‘विजेसारखी मुलभूत सुविधा नसल्याने कोणतेही काम करणे अवघड होते. सोसायटीमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली होती. गरजेच्या सुविधा पुरविण्यासाठी जनरेटर वापरावा लागला, त्यासाठी सुमारे ६०० लीटर डिझेल खर्च झाले. मात्र, प्रत्येक वेळी अशा प्रकारे वीज पुरवणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. पहाटे आणि रात्री अंधारामुळे घराबाहेर पडणेही शक्य नव्हते. वेळेवर देयके आणि सर्व प्रकारचे कर भरूनही अंधारात दिवस काढावे लागतात,’ अशी खंत कोलते पाटील टाउनशिपमधील रहिवासी विनोद बोऱ्हाडे यांनी व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मारूंजी परिसरात आठ वर्षांपासून राहणारे संजय गायकवाड सांगतात, ‘आतापर्यंत वीज नसल्याने एवढा मोठा काळ त्रास सहन करावा लागला नव्हता. मात्र, रविवारी वीज गेली, ती बुधवारी सायंकाळपर्यंत आली नाही. घरात, परिसरात वीज नसल्याने काम करणे, पिण्याचे पाणी मिळवणेही कठीण झाले होते. त्यात मुलांच्या परिक्षा तोंडावर आल्यात, अंधारात त्यांनाही अभ्यास करता आला नाही. नेटवर्क नसल्यानेे महत्वाच्या कामांचा खोळंंबा झाला होता.’दरम्यान, वीज यंत्रणेत यापुढे असे बिघाड होऊ नये म्हणून विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे महापारेषणच्या वतीने सांगण्यात आले.