पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ साठी भूसंपादनाचे काम सन २००८ साली सुरू झाले. सन २०१० पासून वाढीव नुकसान भरपाईसाठी सोलापूर जिल्ह्यातील भूधारकांनी दावे दाखल करण्यास सुरूवात केली. त्याशिवाय राष्ट्रीय महामार्ग क्र. १३ पालखी महामार्ग क्र. ९६५ इ. महामार्गांसाठी दावे दाखल आहेत. अशा अंदाजे चार हजार दाव्यांची सुनावणी आजतागायत प्रलंबित आहे. त्यामुळे हे प्रलंबित दावे निकाली काढण्यासाठी संबंधित दावे पुणे विभागीय आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात आले आहेत.

याबाबत राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाला केलेली विनंती आणि पाठपुराव्यामुळे हे संबंधित दावे पुणे अतिरिक्त विभागीय आयुक्त (महसूल विभाग) यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. याबाबतची अधिसूचना राष्ट्रीय महामार्ग व परिवहन मंत्रालय यांच्याकडून १३ जून रोजी प्रसृत करण्यात आली आहे. याबाबत बोलताना ज्येष्ठ वकील विलास कुलकर्णी म्हणाले, ‘या निर्णयामुळे संबंधित भूधारकांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. दहा-बारा वर्षांपासून प्रलंबित दावे लवकरात लवकर निकाली निघतील, अशी अपेक्षा आहे.’