पुणे :  चौदा वर्षांच्या परिश्रमातून कचरा सेवकांनी घनकचरा संकलनाच्या उभ्या के लेल्या प्रभावी व्यवस्थेला बळकट करण्याऐवजी या व्यवस्थेचे खासगीकरण केले जाणार असल्यामुळे महापालिके च्या या भूमिके विरोधात ‘स्वच्छ सेवा सहकारी संस्थे’ने आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ सेवकांनी मंगळवारी महापालिका भवनापुढे आंदोलन के ले. करोना संकटाने कचरा सेवकांना मारले, आता महापालिका त्यांना मारत आहे. या परिस्थितीत कचरा संकलनाचे खासगीकरण कशाला, असा प्रश्न विचारत खासगीकरणाविरोधात रस्त्यावर उतरून सत्याग्रह करण्याचा निर्धार बाबा आढाव यांनी व्यक्त के ला. कचरा सेवकांच्या न्याय्य हक्कासाठी वेळ पडल्यास तुरुंगातही जाईन, असा इशाराही त्यांनी दिला.

स्वच्छ संस्थेबरोबरचा महापालिके चा करार ३१ डिसेंबर २०२० रोजी संपला आहे. स्वच्छ संस्थेचे काम काढून घेऊन कचरा संकलनाचे खासगीकरण करण्याचा घाट सर्वपक्षीय नगरसेवक आणि प्रशासनाने घातला आहे. त्यामुळे करार न करता स्वच्छ संस्थेला सातत्याने एक किं वा दोन महिन्यांची मुदतवाढ दिली जात आहे. या खासगीकरणाविरोधात स्वच्छ संस्थेने आक्रमक भूमिका घेत मंगळवारी महापालिका भवनापुढे आंदोलन के ले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही स्वच्छ सेवकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या,की यासंदर्भात मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांबरोबर चर्चा करण्यात येईल. स्वच्छ संस्थेबाबत काही चुकीचे घडू दिले जाणार नाही. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रसिद्धीपत्रक काढून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

कचरा वेचकांच्या विम्याचा हप्ता भरणे, वस्तीतील प्रत्येक घरामागे तीस रुपये आणि अन्य घरांमागे १० रुपये कोविड प्रोत्सहन भत्ता द्यावा, प्रारूपातील त्रुटी दूर करून दहा वर्षांसाठीचा करार करावा, सुरक्षा साधने उपलब्ध करून द्यावीत, कचरा वर्गीकरणासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या या वेळी सेवकांनी के ल्या.

या प्रश्नासंदर्भात लवकर तोडगा काढला जाईल. त्यासाठी सर्वपक्षीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित के ली जाईल. कचरा सेवकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार के ला जाईल.

– मुरलीधर मोहोळ, महापौर स्वच्छला सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा

स्वच्छ संस्थेचे काम काढून घेतले जाणार नाही. सेवकांवर कोणताही अन्याय होणार नाही. कचरा सेवकांना आवश्यक ते साहित्य पुरविले जाईल. स्वच्छ संस्थेबरोबर महापालिका कायम असेल, असे आश्वासन सभागृहनेता गणेश बीडकर यांनी आंदोलनावेळी मांडली. स्वच्छच्या कामाबाबतचा सविस्तर प्रस्ताव ठेवावा, अशी सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली.