पुणे : वातावरणातील बदलांमुळे कोकणातील हापूसच्या लागवडीवर परिणाम झाल्याने यंदा हापूसचा हंगाम संपला. दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हापूसची आवक सुरू असते. मात्र या वर्षी एक महिना अगोदरच हंगामाचा शेवट झाला आहे.
पुणे, मुंबईसह राज्यातील प्रमुख फळ बाजारांत सध्या हापूसची तुरळक आवक होत आहे. येत्या चार ते पाच दिवसांत कोकणातून होणारी आंब्याची आवक थांबणार आहे. देवगड, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतून होणारी आवक बंद झाली आहे. गेल्या वर्षी पाऊस लांबला. त्यानंतर अपेक्षित थंडी पडली नव्हती. त्यामुळे कोकणातील हापूसच्या लागवडीवर परिणाम झाला. जानेवारी महिन्यात उष्मा वाढल्याने मोहोर गळून पडला. त्यामुळे हंगामाच्या पहिल्या बहरातील हापूसच्या लागवडीत घट झाली. फळधारणा कमी झाल्याने लागवडीत सुमारे ५० टक्के घट झाली. त्यामुळे यंदा दर वर्षीच्या तुलनेत हापूसचा हंगाम लवकर संपला आहे, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील आंबा व्यापारी युवराज काची यांनी दिली.
मार्केट यार्डातील फळबाजारात सध्या कोकणातून १०० ते २०० पेट्या आवक होत आहे. येत्या चार ते पाच दिवसांत तीही पूर्णपणे थांबणार आहे. हापूसचा हंगाम संपला असून, कर्नाटकातील आंब्याचा हंगाम १५ ते २० जूनपर्यंत सुरू राहणार असल्याने त्या आंब्याची आवक वाढली आहे, अशी माहिती फळ बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.
यंदा दरही जास्त
●यंदा हापूसचा हंगाम उशिराने सुरू झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत दरही जास्त होता. घाऊक बाजारात एक डझन आंब्याचा दर प्रतवारीनुसार ३०० ते ६०० रुपये आहे.
●चार ते आठ डझनाच्या पेटीचा दर १५०० ते ४००० रुपये आहे. गेल्या वर्षी हंगाम बहरात असताना कोकणातून २० ते २५ हजार पेट्यांची आवक झाली होती.
●यंदा अक्षय तृतीयेला हापूसची आवक ८ ते १० हजार पेटी एवढी झाली होती. तुलनेने यंदा आवक निम्म्याने कमी झाली होती, असे आंबा व्यापारी युवराज काची यांनी सांगितले.
सध्या मार्केट यार्डातील फळबाजारात कोकणातून १०० ते २०० पेट्यांची आवक होत आहे. येत्या चार ते पाच दिवसांत हापूसची आवक थांबेल. हंगामातील ही शेवटची आवक असून, दर टिकून आहेत. – अरविंद मोरे, आंबा व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड