लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : दिवाळी सण चार दिवसांवर येऊन ठेपला असून नागरिकांची खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड उडाली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्पात खरेदीसाठी दररोज मोठी गर्दी होत आहे. पुणे शहाराच्या तुलनेत पिंपरीत कपड्यांसह इतर वस्तू कमी दरात मिळत असल्याने खरेदीसाठी शहरासह लगतच्या भागातील नागरिकांची गर्दी होत असल्याचे दिसते.

पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. चारही बाजूंनी शहर वाढत आहे. मोठमोठ्या गृहनिर्माण संस्था उभारल्या जात आहेत. शहराची लोकसंख्या २७ लाखांच्या घरात गेली आहे. पिंपरी कॅम्प ही शहरातील सर्वांत मोठी घाऊक व किरकोळ बाजारपेठ आहे. किराणा मालापासून दागिने, कपडे, खेळणी, गृहोपयोगी वस्तू, इलेक्ट्रीक साहित्य येथे मिळते. त्यामुळे लोणावळा, कामशेत, वडगाव, तळेगाव दाभाडे येथील छोट्या दुकानदारांसह शहरातील महिन्याचा किराणा भरणारे नागरिक कॅम्पातच खरेदीसाठी येतात. शिवाय चऱ्होली, डुडुळगाव, मोशी, चिखली, रावेत, किवळे, मामुर्डी, वाकड या परिसरातील शेतकरी सकाळीच भाजीपाला घेऊन येथे येतात. फूलबाजारही येथेच आहे. त्यामुळे मोठी वर्दळ असते.

आणखी वाचा-अजितदादांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला गटबाजीचे ग्रहण, उद्घाटनापूर्वीच कार्यालय बंद करण्याची नामुष्की

पुण्यापेक्षा पिंपरीतील बाजारपेठेत कमी दरात साहित्य मिळते. पिंपरीतील व्यवसाय उलाढालीवर चालतो. तर, पुण्यातील व्यवसाय हा निश्चित नफ्यावर चालतो. त्यामुळे पुण्यापेक्षा पिंपरीतील दरात तफावत असल्याचे कॅम्पातील व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. दिवाळीच्या खरेदीसाठी पिंपरी कॅम्पात नागरिकांची झुंबड उडायला लागली आहे. सायंकाळनंतर कॅम्पातून चालता येत नाही, एवढी गर्दी होते. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. वाहनांच्या रांगा लागत आहेत. पिंपरीत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

आणखी वाचा-पुणे : वाघोलीत विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यातील कापड व्यावसायिक पिंपरीत

पिंपरी-चिंचवड शहर वाढत असल्याने आणि मागणी वाढल्याने पुण्यातील नामांकित कापड व्यावसायिकांनी आपल्या शाखा पिंपरीत सुरू केल्या आहेत. नामांकित कापड व्यावसायिकांनी शहरात मोठी दुकाने थाटली आहेत. या दुकानांमध्येही खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिंपरीतील व्यवसाय उलाढालीवर चालतो. त्यामुळे पुण्याच्या तुलनेत कमी दरात साहित्य मिळते. होलसेल बाजारपेठ विकसित होत आहे. सर्व वस्तू पिंपरीत मिळतात. त्यामुळे छोटे व्यापारी खरेदीसाठी येतात. शहरालगतच्या भागातील नागरिकही खरेदीसाठी पिंपरीत येतात. -प्रभू जोधवानी, अध्यक्ष, पिंपरी कपडा मर्चंट असोसिएशन