तुमचे समर्थन भ्रष्टाचाऱ्यांना आहे की भ्रष्टाचारमुक्तीला आहे, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. ते बुधवारी पुणे येथील जाहीर सभेत बोलत होते. तत्त्पूर्वी उद्धव यांनी बुधवारी मुंबईत शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना मोदी सरकारला नोटाबंदीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा लक्ष्य केले. उद्धव यांनी नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारकडून करण्यात येत असलेल्या घोषणांचेही वाभाडे काढले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तुमचे समर्थन भ्रष्टाचाऱ्यांना आहे की भ्रष्टाचारमुक्तीला, असा सवाल विचारत उद्धव यांना पेचात पकडण्याचा प्रयत्न केला.


दरम्यान, या सभेत मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा तोडणाऱ्यांवरही टीका केली. राम गणेश गडकरी यांचा पुतळा तोडणारे संकुचित आहेत. त्यांना शिवराय आणि संभाजी कळलेच नाहीत. शिवराय किंवा संभाजी यांना विशिष्ट साच्यात बसवता येणार नाही. शिवराय जाती-धर्मापलिकडचे देव आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. गडकरी यांचा पुतळा तोडणारे सापडले आहेत. आता त्यांच्या बोलविते धनीही आम्ही शोधून काढू, असे फडणवीस यांनी सांगितले.

पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जंगली महाराज रोडवर संभाजी उद्यान आहे. मुठा नदी किनारी वसलेल्या या उद्यानात नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा आहे. १९६२ मध्ये आचार्य अत्रे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हा पुतळा होता. राम गणेश गडकरी स्मारक समितीने पुणे महापालिकेला हा पुतळा भेट म्हणून देण्यात आला होता.  मंगळवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवला. हा पुतळा मुठा नदीत फेकण्यात आला होता. मंगळवारी सकाळी उद्यान उघडल्यावर हा सर्व प्रकार समोर आला. पुतळा हटवण्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली होती. सीसीटीव्ही कॅमे-याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला होता. याप्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी अटक केली होती.