नारायणगाव : राज्य सरकारने उपोषणाला दिलेली एक दिवसाची परवानगी म्हणजे मराठा समाजाची चेष्टा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आडमुठी भूमिका सोडून मराठ्यांना न्याय द्यावा, अन्यथा त्यांच्या राजकीय कारकिर्दीला धोका निर्माण होईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ‘मी गोळ्या झेलण्यास तयार आहे; पण आरक्षण मिळेपर्यंत हटणार नाही,’ असा निर्धारही त्यांनी केला.

मराठा आंदोलकांचे पहाटे जुन्नरमध्ये येथे आगमन आले. किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापासून पारंपरिक वाद्यांच्या गजरात आंदोलक हे शिवाई मंदिरात आल्यानंतर जरांगे यांच्या हस्ते शिवाई देवीची आरती करण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषदेत जरांगे म्हणाले, ‘मराठा तरुणांच्या वेदना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी समजून घेणे गरजेचे आहे. उपोषणाला केवळ एक दिवसाची परवानगी देणे म्हणजे मराठा समाजाचा अपमान आहे. यातून काहीही साध्य होऊ नये, असा सरकारचा उद्देश दिसतो. समाजात नाराजी पसरली असून, याबाबतचा संदेश राज्यभर गेला आहे.’

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांच्या नाराजीचा धोका होऊ शकतो. फडणवीस यांना मराठ्यांची मने जिंकण्याची योग्य संधी आहे. त्यांनी मराठाविरोधी भूमिका सोडून दिली पाहिजे. ते आमचे वैरी नाहीत. आम्ही फक्त लोकशाही मार्गाने आरक्षणासाठी भांडतो आहोत. फडणवीस यांनी मराठ्यांचा अवमान न करता, त्यांच्या हक्काच्या ओबीसी आरक्षणाचा विचार करून सन्मान करावा. मराठा समाज उपकार कधी विसरत नाही; पण अपमान करणाऱ्याला सोडत नाही,‘ असेही जरांगे म्हणाले.

शिंदे समितीने कुणबी नोंदीबाबत दिलेला अहवाल फेटाळून जरांगे म्हणाले, ‘गॅझेटमध्ये कुणबींची संख्या स्पष्टपणे नमूद आहे, केवळ आकडेवारी नाही,’

‘आंदोलकांनी संयम आणि शांतता राखावी. नियमांचे पालन करावे. कोणत्याही चुकीमुळे समाजाच्या तोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ नये. गरज भासल्यास आंदोलक टप्प्याटप्प्याने ये-जा करू शकतात, जेणेकरून आंदोलनाची धार कायम राहील,’ असेही त्यांनी सांगितले.

आंदोलकाचा हृदयविकाराने मृत्यू

मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय असलेले सतीश ज्ञानोबा देशमुख (वय ४४) या आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. जरांगे यांच्या ताफ्यासोबतच त्यांचे वाहन होते. ते लेण्याद्री येथे रात्री मुक्कामी होते. गुरुवारी सकाळी नारायणगाव येथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. उपचारासाठी त्यांना नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील, भाऊ असा परिवार आहे. देशमुख हे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील वरगावचे रहिवासी आहेत.