देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन; लोकमान्यांवरील पुस्तकाचे प्रकाशन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तरुणाईचा देश ही ओळख होत असलेल्या भारतातील तरुणाईचा उपयोग करून लोकमान्यांचा स्वदेशीचा विचार विकसित केला जात आहे. ‘आम्ही भारतासाठी तर बनवूच पण, जगासाठीही बनवू’ या भूमिकेतून लोकमान्यांचा स्वदेशीचा आणि स्वावलंबनाचा विचार आजही कालसुसंगत आहे. टिळकांच्या जाज्वल्य विचारांनी स्वातंत्र्य मिळवून दिले. आता स्वराज्याकडून सुराज्याकडे वाटचाल करण्यासाठीच ‘मेक इन इंडिया’ आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ या लोकमान्य टिळक यांच्या सिंहगर्जनेच्या शताब्दीनिमित्त लोकमान्य टिळक विचार मंच आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर या वेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या घोषणेद्वारे टिळकांनी देशाच्या स्वातंत्र्यलढय़ाला ऊर्जा आणि क्रांतिकारकांना प्रेरणा दिली. १८५७ चे स्वातंत्र्यसमर इंग्रजांनी मोडून टाकले. त्यानंतर समाजामध्ये नैराश्येची भावना आणि समाज लढण्याची वृत्ती गमावून बसतो ही भीती वाटत असताना टिळकांच्या सिंहगर्जनेने प्रेरणा दिली. गणेशोत्सवासारखे माध्यम असेल किंवा देशभक्तीचे जाज्वल्य आणि परखड विचार मांडणारे लेखन यातून टिळकांनी सामाजिक अभिसरण केले.

लोकमान्यांची चतु:सूत्री आजही महत्त्वाची आहे. या शताब्दी वर्षांत लोकमान्यांना अभिप्रेत गणेशोत्सव साजरा व्हावा. विविध उपक्रमांनी शताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis presented in lokmanya tilak book publication program
First published on: 24-07-2016 at 03:17 IST