पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पुणे-आळंदी पालखी मार्गावर वडमुखवाडी येथे उभारण्यात आलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज भेटीचे समूहशिल्प व संतसृष्टीचे लोकार्पण, संतपीठ येथील प्रेक्षागृह व कलादालन लोकार्पण यासह विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (बुधवारी) होणार आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ही माहिती दिली. संतसृष्टी लोकार्पण हा कार्यक्रम थोरल्या पादुका, वडमुखवाडी, चऱ्होली येथे सकाळी साडेदहा वाजता होईल. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या ऐतिहासिक भेटीचे स्मरणरूप ‘संतसृष्टी’ साकारण्यात आली आहे. या ठिकाणी मिश्र धातूपासून तयार करण्यात आलेली २५ शिल्पे असून, संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान महाराज, संत निवृत्तिनाथ महाराज, संत मुक्ताबाई आणि २० वारकरी समाविष्ट आहेत. या शिल्पांसोबतच चौथरा, रिटेनिंग वॉल, स्टोन क्लॅडिंग, ओपन एअर थिएटर, विद्युत, बागकाम, रेलिंग व स्वच्छतागृह यांची कामेही पूर्ण झाली आहेत. या परिसरात संतांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांवर आधारित ४७ ब्रॉन्झ म्यूरल उभारण्यात आली असून, त्यांच्या शेजारी माहिती देणारे फलकही लावण्यात आले आहेत.
चिखलीतून ऑनलाइन भूमिपूजन, लोकार्पण
संतपीठ येथील कार्यक्रम झाल्यानंतर ‘चिखली टाऊन हॉल’ येथे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विकसित ज्येष्ठ नागरिकांकरिता ॲप, वाहतूक नियमनाकरिता व्हॉट्स ॲप प्रणालीचे लोकार्पण, तसेच महापालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन, लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन होणार आहे.