पुणे: स्वतंत्र घर भाड्याने घेण्यापेक्षा को-लिव्हिंगला तरुणाईची वाढती पसंती मिळत आहे. कमी भाडे आणि सर्व सोयींनी युक्त निवासाची व्यवस्था यामुळे नोकरदारांसह विद्यार्थ्यांचा को-लिव्हिंगकडे कल वाढला आहे. पुण्यात माहिती-तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांच्या परिसरात प्रामुख्याने को-लिव्हिंग सुविधांमध्ये मोठी वाढ झालेली आहे.
कोविड संकटाच्या काळानंतर को-लिव्हिंगला गती मिळाली आहे. यामागे प्रामुख्याने शिक्षण आणि रोजगारासाठी शहरामध्ये होणारे स्थलांतर कारणीभूत ठरले. बंगळुरू, मुंबई, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद आणि पुण्यात ही मागणी जास्त आहे. अनेक मोठ्या कंपन्या या व्यवसायात असून, स्वतंत्रपणे अनेक इमारत मालकही या सुविधा चालवत आहेत.
देशभरात गेल्या काही वर्षांपासून महानगरांसह छोट्या शहरांमध्ये को-लिव्हिंगची सुविधा वाढत आहेत. देशातील शहरांमध्ये २० ते ३४ वयोगटातील सुमारे ५ कोटी स्थलांतरित लोकसंख्या सध्या असण्याचा अंदाज असून, हे या वाढीचे प्रमुख कारण आहे. सध्या देशभरात को-लिव्हिंगच्या एकूण बेडची संख्या ३ लाख असून, ती २०३० पर्यंत १० लाखांवर जाणार आहे.
सध्या एकूण बेडची मागणी ६६ लाख आहे. ही संख्या २०३० पर्यंत वाढून ९१ लाखांवर पोहोचण्याची शक्यता आहे. या बाजारपेठेतील सध्याची उलाढाल ४० अब्ज डॉलर असून, ती २०३० पर्यंत २०६ अब्ज डॉलरवर जाण्याचा अंदाज ‘कॉलिअर्स इंडिया’च्या ताज्या अहवालात वर्तविण्यात आला आहे.
घरभाड्यापेक्षा २५ ते ३० टक्के स्वस्त
पुण्याचा विचार करता हिंजवडी, विमाननगर, बाणेर, खराडी, बालेवाडी, मगरपट्टा, कल्याणीनगर आणि कोथरूड या परिसरात या को-लिव्हिंग सुविधा अधिक आहेत. आयटी कंपन्यांच्या परिसरात या सुविधांची संख्या अधिक आहे. त्यात या सुविधांच्या दर्जानुसार आणि तिथे मिळत असलेल्या सेवांनुसार दरमहा भाडे ठरते. त्यामुळे हे मासिक भाडे ५ हजारांपासून ६० हजारांपर्यंत आहे. पुण्यात सध्या १ बीएचके सदनिकेचे सरासरी मासिक भाडे १२ हजार ७०० रुपये ते २२ हजार ५०० रुपये आहे. याच वेळी को-लिव्हिंगचे सरासरी मासिक भाडे ९ हजार ५०० रुपये ते १५ हजार ७०० रुपये आहे. त्यामुळे स्वतंत्र घर भाड्याने घेण्यापेक्षा को-लिव्हिंगमध्ये राहणे २५ ते ३० टक्के स्वस्त आहे.
को-लिव्हिंग क्षेत्रात आगामी काळात मोठी वाढ होणार आहे. स्वतंत्रपणे घर भाड्याने घेण्यापेक्षा सहज, सोपा आणि कमी खर्चिक असा पर्याय आहे. नोकरी आणि शिक्षणासाठी स्थलांतराचे प्रमाण वाढल्याने को-लिव्हिंगच्या पर्यायाला पसंती मिळत आहे. – बादल याज्ञिक, मुख्याधिकारी, कॉलिअर्स इंडिया
को-लिव्हिंगचे फायदे
– स्वतंत्र घरापेक्षा भाडे कमी
– दैनंदिनसह मासिक वापराची लवचीकता
– स्वच्छता, देखभालीची जबाबदारी चालकावर
– कपडे धुणे, जेवण यासह इतर अनेक सेवा
– एकत्र खोलीसोबतच स्वतंत्र खोलीचाही पर्याय