पुणे : विमाननगर भागातून अपहरण झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचा खून झाल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री उशीरा उघडकीस आली. अभियांत्रिकी शाखेतील तरुणीचा खून तिचा मित्राने साथीदारांच्या मदतीने केला असून, तिचा मृतदेह सुपे गावाजवळ पुरल्याचे उघडकीस आले.

भाग्यश्री सूर्यकांत सुडे (वय २२ ) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी शिवम फुलावळे, सागर जाधव, सुरेश इंदुरे यांना अटक करण्यात आली. याबाबत भाग्यश्रीचे वडील सूर्यकांत ज्ञानोबा सुडे (वय ४९, रा. हरंगुळ बुद्रुक, जि. लातूर) यांनी विमाननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सूर्यकांत यांची मुलगी भाग्यश्री वाघोलीतील एका अभियांत्रिकी महाविद्यालायत शिक्षण घेत होती. ३० मार्च रोजी सायंकाळी तिने आईच्या मोबाइलवर संपर्क साधला होता. तेव्हा मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी विमाननगरमधील फिनिक्स मॉलमध्ये जाणार असल्याचे तिने आईला सांगितले होते. त्यानंतर ३१ मार्च रोजी तिच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्यात आला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. तिच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार विमानतळ पोलीस ठाण्यात दिली होती.

हेही वाचा >>> मर्चंट नेव्हीत काम करणारा पुण्यातील तरूण बेपत्ता… झाले काय?

त्यानंतर २ एप्रिल रोजी मुलीच्या मोबाइल क्रमांकावर संदेश आला. तुमच्या मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. मुलीची सुखरूप सुटका करण्यासाठी तातडीने नऊ लाख रुपये द्या. अन्यथा मुलीचे बरेवाईट करू, असे संदेशात म्हटले होते. भाग्यश्रीच्या वडिलांनी या बाबतची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन धामणे, उपनिरीक्षक चेतन भोसले यांनी तपास सुरू केला.

हेही वाचा >>> सामूहिक बलात्कार प्रकरणातील नऊ वर्ष पसार असलेल्या आरोपीला अटक

तांत्रिक तपासात भाग्यश्रीचा मित्र शिवम फुलावळे याने साथीदारांच्या मदतीने तिचा खून केल्याची माहिती मिळाली. तिचा मृतदेह नगर जिल्ह्यातील सुपे गावाजवळ एका शेतात पुरल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी तपास करून तिघांना अटक केली.

कर्जबाजारी झाल्याने खून

आरोपी शिवम फुलावळे कर्जबाजारी झाला होता. भाग्यश्रीचे अपहरण केल्यास पैसे मिळतील, असे त्याला वाटले होते. त्याने साथीदारांशी संगनमत करून तिचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले.