भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावर महाविद्यालयीन तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. शुभम प्रदीप चोपडे (वय १७, रा. बारामती, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. शुभम बारामतीतील शारदाबाई पवार कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होता. शुक्रवारी महाविद्यालयाची सहल रायरेश्वर किल्ला परिसरात आली होती.

रायरेश्वर किल्ला चढत असताना कोरले गावाजवळ शुभमला हृदयविकाराच्या झटका आला. तो बेशुद्ध पडला. त्याला तातडीने ग्रामस्थांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती भोर तालुक्याच्या तहसीलदारांनी दिली. शुभम मनमिळावू स्वभावाचा होता. त्याचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीय, शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थ्यांना धक्का बसला.