बारामतीतील घटना

महाविद्यालयीन तरुणीने स्वत:वर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना बारामती शहरातील सूर्यनगरी सोसायटीत शनिवारी रात्री घडली. कुटुंबीयांकडून लाड होत नसल्याने तसेच आपल्या राहणीमानावर आक्षेप घेतल्याने आत्महत्या करत असल्याचे तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

संध्या ऊर्फ सायली मानसिंग बळी असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायलीचे वडील मानसिंग हे लष्करात हवालदार आहेत. सध्या ते सिक्कीम येथे नेमणुकीस आहे. बळी कुटुंबीय मूळचे सातारा जिल्ह्य़ातील कोरेगाव तालुक्यातील बोरजायवाडी येथील आहे. वडील लष्करात असल्याने तिचे शिक्षण परराज्यात झाले आहे. गेल्या वर्षी सायली, तिची आई आणि भाऊ साहिल हे बारामतीला स्थायिक झाले होते. सायलीने बारामतीतील महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. सूर्यनगरी सोसायटीतील सुधाअंगण अपार्टमेंटमध्ये बळी कुटुंबीय राहत होते.

सायली शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घरी एकटीच होती. तिची आई आणि भाऊ साहिल हे बाहेर गेले होते. त्या वेळी सायलीने घरात ठेवलेल्या देशी बनावटीच्या पिस्तुलातून स्वत:च्या कपाळावर गोळी झाडली. गोळी कपाळातून आरपार झाल्याने ती मृत्युमुखी पडली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा सायलीच्या मृतदेहाशेजारी देशी बनावटीचे पिस्तूल आणि तिने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी (सुसाइड नोट) सापडली.

मला कुटुंबाकडून प्रेम मिळत नाही. लहान भावाचे लाड होतात तसेच माझ्या राहणीमानावर आक्षेप घेण्यात आल्याने आत्महत्या करत असल्याचे सायलीने चिठ्ठीत लिहिले आहे. सायलीच्या मृतदेहाचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

देशी बनावटीचे पिस्तूल कोठून आणले?

सायली बळीने स्वत:च्या कपाळावर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर बारामती शहरात खळबळ उडाली. सायलीचे वडील लष्करात आहेत. पण देशी बनावटीचे पिस्तूल सायलीने कोठून आणले, हा प्रश्न पोलिसांसमोर आहे. तिच्या वडिलांनी घरात बेकायदेशीर रीत्या देशी बनावटीचे पिस्तूल आणून ठेवल्याचा संशय पोलिसांना आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे तपास करत आहेत.