कमी किमतीत नशेची झिंग देणाऱ्या ‘मॅजिक मशरूम’ या पदार्थाचा वापर पुण्यातील महाविद्यालयीन तरुणांमध्ये वाढला असून, त्याचा जास्तीत जास्त वापर केला जात असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. ही मशरूम पुरविणाऱ्या केरळच्या तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. याबाबत अमली पदार्थ विरोधी पथकांकडून पुण्यातील पाच महाविद्यालयांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनिल तांबे यांनी राकेश विजय किडो (वय २६, रा. केरळ) या तरुणाला सिम्बॉयोसिस कॉलेजसमोर चरस विक्री करताना गेल्या आठवडय़ात पकडले होते. त्याच्याकडे तपास केल्यानंतर तो पुण्यातील काही महाविद्यालयांमध्ये मॅजिक मशरूम पुरवठा करत असल्याचे सांगितले. तसेच, शहरातील काही नाईट क्लबमध्ये तरुणांना हे मशरूम दिले जात असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील काही क्लबकडून तरुणांना आकर्षित करण्यासाठी या मशरूमची जाहिरातही करण्यात आली होती. आरोपी किडो याने काही महाविद्यालयांबरोबर काही नाईटक्लब आणि हॉटेल्समध्ये हे मशरूम दिल्याचे तपासात सांगितले असून त्यासाठी त्याला काही परदेशी तरुणांनी मदत केल्याचे समोर आले आहे. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
तामिळनाडू येथील कोडाई कॅनल या ठिकाणीच फक्त या मॅजिक मशरूमची बेकायदेशीपणे शेती केली जाते. इतरत्र हे मशरूम उगवत नाही. त्यामुळे या राज्यातून प्लॅस्टिकच्या बंद डब्यातून मॅजिक मशरूमची तस्करी केली जाते. नशेसाठी ओलेच मशरूम खावे लागते. चरस, कोकेन यांच्या किमतीपेक्षा मॅजिक मशरूमची किंमत कमी आहे. मॅजिक मशरूमचा एक गोळा साधारण चारशे रुपयांपासून मिळतो. मॅजिक मशरूम हे ‘हॅल्युसिनायझेशन’ या प्रकारातील अमली पदार्थ आहे. हे खाल्ल्यानंतर आभास झाल्यासारखी एक वेगळ्या प्रकारची नशा येते. इतर अमली पदार्थाच्या तुलनेत हे खल्ल्याचे ओळखू येत नाही. कमी किमतीमध्ये वेगळी नशा येत असल्यामुळे महाविद्यालयीन तरुणांमध्ये अलीकडे मॅजिक मशरूमची मागणी मोठय़ा प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे. या मॅजिक मशरुमची पुण्यातील काही विशिष्ट महाविद्यालय आणि त्यांच्या परिसरात विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून पुण्यातील पाच महाविद्यालयांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.